कडेगाव : कडेगावच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या संगीता जाधव यांची, तर उपनगराध्यक्षपदी सागर सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी काम पहिले. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.
कडेगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारत १७ पैकी १० जागा जिंकल्या होत्या. नगराध्यक्षपद ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव असल्याने आकांक्षा जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. उपनगराध्यक्षपदी साजिद पाटील यांना संधी मिळाली होती. त्यानंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने काँग्रेसच्या नीता देसाई व उपनगराध्यक्ष पदासाठी प्रशांत ऊर्फ राजू जाधव यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर संगीता राऊत यांना नगराध्यक्षपद तर दिनकर जाधव यांना उपनगराध्यक्षपद मिळाले. दरम्यान, पक्षाने ठरवून दिलेला कालावधी संपल्यानंतर नगराध्यक्षा राऊत व उपनगराध्यक्ष जाधव यांनी राजीनामे दिले होते. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता.
नगराध्यक्षपदासाठी संगीता जाधव तर उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचेच सागर सूर्यवंशी यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र थोरात, गुलाम पाटील, सोनहिरा कारखान्याचे संचालक दीपक भोसले, माजी सरपंच विजय शिंदे, माजी नगराध्यक्षा संगीता राऊत, आकांक्षा जाधव, दिनकर जाधव, राजू जाधव, साजिद पाटील, सुनील पवार, रिजवाना मुल्ला आदी उपस्थित होते.