संख : महसूल विभाग, पोलिसाच्या दुर्लक्षाने भिवर्गी (ता. जत) येथील बोर नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा रात्रं-दिवस राजरोस सुरू आहे. काळ्या सोन्याची लूट सुरू आहे. ‘महसूल विभाग कोमात, वाळू तस्करी जोमात’ अशी अवस्था आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
पूर्व भागातील भिवर्गी परिसरात चांगली वाळू मिळते. सध्या संख अप्पर तहसीलदार लाचप्रकरणात अडकल्याने ही जागा रिक्त आहे. हंगामी पदभार जतचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे आहे. याचा नेमका फायदा वाळू तस्करांनी घेतला आहे. कर्नाटकमध्ये वाळूला जास्त मागणी आहे. यामुळे रात्र-दिवस वाळू उपसा केला जातो आहे. यामध्ये काही स्थानिकांचाही सहभाग आहे.
याबाबत ग्रामपंचायतीने एप्रिल महिन्यात प्रांताधिकारी प्रशांत आवटी, तत्कालीन अप्पर तहसीलदार हणमंत मेत्री यांच्याकडे अवैध वाळू तस्करीबाबत पत्र दिले आहे. ग्रामस्थांनी वर्षांपूर्वी बोर ओढा पात्रालगत रस्ता खोदून तस्करीला चाप लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना दमदाटीचा प्रकार घडला हाेता. याप्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता.
चाैकट
पाण्याची पातळी खालावली
ओढा-पात्रात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता बारीक रेतीच्या वाळूमध्ये आहे. वाळूने भूगर्भातील पाण्याची पातळी टिकवून ठेवली जाते. विहीर, कूपनलिकांची पाणी पातळी टिकून होती. वारेमाप वाळू उपशाने पाणीपातळीवर परिणाम झाला आहे. उन्हाळ्यात पाण्याची पातळी ८०० ते ९०० फुटांपर्यंत खाली जात आहे.
चाैकट
चोर-पोलिसांचा खेळ
महसूल विभागाकडून छापे टाकले जात आहेत. काही वेळा अगोदर छापे पडणार असल्याची सूचना मिळते. त्यामुळे तस्कर वाहने घेऊन पसार होतात. ती सापडत नाहीत. हा चोर-पोलिसांचा खेळ नित्याचा झाला आहे.
काेट
भिवर्गीत वाळू तस्करीची माहिती मिळाली आहे. महसूल विभाग रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा भाग दूर असल्याने दुर्लक्ष झाले आहे.
- सचिन पाटील, तहसीलदार, जत
काेट
वाळू उपशाने ओढ्यालगतच्या शेतीला धोका निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून वाळू तस्करी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवावी.
- रामू शिवयोगी चलवादी. शेतकरी, भिवर्गी
फोटो : २८ संख १
ओळ : भिवर्गी (ता. जत) येथील बोरनदीच्या पात्रात वाळू उपसा झाल्याने मोठे खड्डे पडले आहेत.