------
सांगलीच्या राजकारणात आणि कुस्तीच्या आखाड्यात बिजली मल्ल म्हणून ख्याती असणारे पहिलवान संभाजी पवार हे सर्वसामान्य जनतेचे असामान्य नेते होते. त्यांच्या निधनाने दलितांचा साथी. गरिबांचा आधारस्तंभ, कष्टकरी, शेतकरी, कामगारांचा बुलंद आवाज हरपला आहे. रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
------------
राजकीय आणि कुस्तीचा आराखडा संभाजी पवार यांनी गाजविला आहे. गोरगरीब लोकांना सहज उपलब्ध होणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते आयुष्यभर संघर्ष करीत राहिले. आमचे त्यांच्याशी कौटुंबिक ऋणानुबंध होते. त्यांच्या निधनाने सांगलीच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. - संजयकाका पाटील, खासदार
------------
कुस्ती सुरू होऊन डोळ्याचे पाते लवते न लवते तोच प्रतिस्पर्धी मल्लाला धोबीपछाड देण्याची खासियत असणारे बिजली मल्ल संभाजी पवार (वय ८०) यांच्या निधनाने मोठा धक्का बसला. ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभा दणाणून सोडायचे. अप्पांनी चळवळीत मला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अप्पांनी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष केला. - राजू शेट्टी, माजी खासदार
----------
संभाजी पवार हे लाल मातीतील कुस्ती टिकावी म्हणून आग्रही होते. गोरगरीब जनतेच्या मदतीला रात्री-बेरात्री ते धावून जात. कोणताही राजकीय वारसा नसताना चार वेळा आमदार म्हणून ते निवडून आले. महाराष्ट्र एका उत्कृष्ट संघटक, मार्गदर्शक, धडाडीच्या राजकारणी व्यक्तिमत्त्वाला मुकला आहे. - उत्तमराव पाटील, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक.
----------