सांगली : जागतिकीकरणाच्या प्रवाहात अनेक पारंपरिक कल्पना मागे पडत चालल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या संगणकीय युगात लक्ष्मीपूजनादिवशी वहीपूजनाच्या परंपरेवर देखील काही प्रमाणात परिणाम झाला आहे. हल्ली सर्वच व्यापाऱ्यांकडे संगणक असतो. साहजिकच रोजच्या खर्चाचा ताळमेळ ठेवण्यासाठी संगणकीय ‘बॅलन्स शीट’चा वापर वाढत आहे. त्यामुळे पूर्वी हमखास गरजेच्या असलेल्या रोजमेळ वह्यांचा वापर दिवसेंदिवस घटत चालल्याचे चित्र आहे. धनत्रयोदशीला कित्येक व्यापारी वर्षाचा ताळेबंद मांडण्यासाठी हमखास रोजमेळ, कीर्द, खतावणी आदी प्रकारच्या वह्या घेतात. जागतिकीकरण झाले असले तरीही अद्याप सर्वच जण मुहूर्ताची वेळ पाळून धनत्रयोदशीला वह्यांची खरेदी करतात. परंतु यंदा यामध्ये सुमारे १५ ते २० टक्के घट झाली आहे. रोजमेळच्या वह्यांवर ताळेबंद मांडण्यापेक्षा संगणकावर हिशेब ठेवणे खूप सोपे झाले आहे. आजकाल बहुतांशी व्यापारी सर्रास संगणकाचा वापर करतात. त्यामुळे त्यांना रोजच्या रोज ‘बॅलन्स शीट’ भरण्याची सवय झाली आहे. काही व्यापाऱ्यांनी या कामासाठी ताळेबंदाचे ज्ञान असलेल्या व्यक्तींची नेमणूक देखील केलेली आहे. संगणकीय युग असले तरीही परंपरेप्रमाणे अद्यापही बहुतांश व्यापारी रोजमेळ वह्यांचा वापर करीत असल्याचे चित्र आहे. परंतु वह्या विक्रीत झालेली घट लक्षात घेता, दिवसेंदिवस वही विक्रीत घट होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे. यंदा संगणकप्रेमी व्यापाऱ्यांनी केवळ ‘शास्त्र’ म्हणून लक्ष्मीवही घेण्यास पसंती दिली आहे. तसेच काही आधुनिक विचारांच्या व्यापाऱ्यांनी पारंपरिक वही पूजनासच फाटा दिल्याचे चित्र आहे. असे असले तरीही बाजारपेठेत रोजमेळ वह्या १५० ते ६०० रुपये, लक्ष्मी वही ३० ते १२० रुपये, कीर्द वही १०० ते २३० रुपये, आवक-जावक वही ९० ते २५० रुपये या किमतीत उपलब्ध आहेत. उद्या लक्ष्मीपूजनादिवशी व्यापाऱ्यांकडून वह्यांची विधिवत पूजा करण्यात येईल. (प्रतिनिधी)लक्ष्मीपूजनाचे मुहूर्तआज गुरुवारी लक्ष्मीपूजनादिवशी मुहूर्तावर रोजमेळ, खतावणी, कीर्द वह्यांची पूजा करण्यात येणार आहे. यासाठी लक्ष्मीपूजन मुहूर्त पुढीलप्रमाणे आहेत. सायंकाळी ४.३२ ते ८.४२ आणि रात्री ९.०१ ते उ. रा. ३. २२.रोजमेळ वही विक्रीवर यंदा परिणाम झाला असला, तरीही त्याचा फार मोठा फटका वही विक्रेत्यांना बसणार नाही. कारण अजूनही लक्ष्मीपूजनाला मुहूर्त पाळण्यासाठी वहीची पूजा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे बहुतांशी व्यापारी बांधवांकडून वही खरेदीत खंड पडणार नाही.- धनंजय कोटणीस, रोजमेळ वही विक्रेते, सांगली.
संगणकामुळे रोजमेळ वह्यांची विक्री घटली
By admin | Updated: October 23, 2014 00:06 IST