सांगली : विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये देवगड हापूस आंब्याच्या पेटीत कर्नाटक हापूस आंबे भरताना माधवनगर (ता. मिरज) येथील अजित शिवाजी जावीर यास बाजार समितीच्या भरारी पथकाने छापा टाकून पकडले. त्याच्याकडून एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
अजित जावीर देवगड हापूस आंब्याच्या पेटीमध्ये कर्नाटक हापूस आंबा भरून विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बाजार समितीच्या भरारी पथकाने आंबे आणि पेटीची तपासणी केली. यावेळी जावीर याने बोगसगिरी केल्याचे उघडकीस झाल्यामुळे त्याला एक हजारांचा दंड केला. यापुढे असा प्रकार केल्यास कठोर कारवाईची सूचना देऊन सोडून देण्यात आले, अशी माहिती फळ मार्केटचे सहा. सचिव चंद्रकांत सरडे यांनी दिली.
चौकट -
बोगसगिरी करणाऱ्यांवर कारवाई
विक्रेत्यांकडून आंबा विक्रीमध्ये बोगसगिरी करून ग्राहकांची फसवणूक करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल. संबंधित अडते, व्यापारी, खरेदीदार यांनीही आंबा विक्रीत बाेगसगिरी होणार नाही याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे.