सांगली : येत्या काही दिवसात नोकरदार माणसाला मिळणाऱ्या पगाराप्रमाणे शेतकऱ्याला पगार सुरू करण्याची योजना विचारात असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. वाळवा येथे दोन विकासकामांचे लोकार्पण आणि दोन कामांचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. हे शासन महाराष्ट्रातील सामान्य माणूस, शेतकऱ्यांचे आहे. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना आधार दिला आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
शेतीमाल विकल्यानंतर साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्याने शासनाकडे 10 हजार, 20 हजार ते जास्तीत जास्त 50 हजार रुपये ठेवायचे. त्यानंतर रकमेनुसार दर महिन्याच्या 5 तारखेला शेतकऱ्याच्या पत्नीच्या खात्यावर आरटीजीएसने ठराविक रक्कम जमा होईल. यामध्ये जर शेतकऱ्याने 30 हजार रुपये ठेवले तर दर महिन्याच्या 5 तारखेला पत्नीच्या खात्यावर आरटीजीएसने 3 हजार रुपयेप्रमाणे वर्षाला 36 हजार रुपये जमा होणार.शेतकऱ्याने 50 हजार रुपये भरले तर प्रतिमाह 5 हजार रुपये प्रमाणे वर्षाचे 60 हजार रुपये पत्नीच्या खात्यावर जमा होणार. यामध्ये भरलेल्या रकमेपेक्षा 10 हजार रुपये जास्त त्यांना मिळणार आहेत. अशा प्रकारची योजना सुरू करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नागनाथअण्णा नायकवडींच्या स्मारकासाठी 10 कोटी रुपये तरतूदनागनाथअण्णा नायकवडींच्या स्मारकासाठी 10 कोटी रुपये तरतूद राज्य शासनाने केली असल्याचे सांगून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या साडेचार वर्षात देशाचे संपूर्ण स्वरूप बदलले आहे. शेतकरी, सामान्य माणूस सुखी होण्यासाठी शासन कार्यरत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सामान्य माणसाच्या घराचे स्वप्न सत्यात येत आहे, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत मोफत गॅस जोडणी महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून गर्भवती महिलेच्या आरोग्याची काळजी, अपूर्ण सिंचन योजनांच्या पूर्ततेसाठी भरीव निधी, स्वच्छ महाराष्ट्र अभियानातून शौचालय बांधणी, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, एफआरपी देणे बंधनकारक केले.
आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकाला वर्षाला 5 लाख रुपयांचा मोफत उपचार देण्यात येत आहे. एकूणच घर, शौचालय, गॅस, आजारपणात मोफत औषधोपचार, रस्ते, सिंचन योजनांचा 81 टक्के वीजबिल शासन भरणार अशा अनेक बाबींतून शासन सामान्य माणूस सुखी होण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, वाळवा तालुक्यात छोट्या छोट्या गावातही रस्त्यांचे जाळे विणले आहे. लहान-मोठ्या गावच्या अनेक पाणीयोजना पूर्ण केल्या आहेत. अहिरवाडी येथे निर्यात सुविधा केंद्रासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्याला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न आहे.वाळवा येथील विकासकामांचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यामध्ये हुतात्मा चौक ते कोट भाग चावडीपर्यंतचा गावांतर्गतचा रस्ता डांबरीकरणाचे काम पूर्ण असून त्यासाठी 30 लाख रुपये निधी खर्चण्यात आला आहे. वाळवा तालुक्यातील आठवडी बाजार विकसित करण्यासाठी 30 लाख रुपये निधी खर्चण्यात आला आहे. यामध्ये आठवडी बाजारातील बाजार कट्टे, पेव्हींग ब्लॉक, मटण मार्केट या कामांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पुसेसावळी - वांगी - नागठाणे - वाळवा - बोरगाव - कासेगाव - वाटेगाव - टाकवे (राज्य मार्ग 158) अंतर्गत वाळवा - बोरगाव ते बहे पूल या कामाचे मजबूतीकरण कामाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
या कामासाठी 7 कोटी रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण तसेच पाच गाळ्याचा उंच पातळीचा लहान पूल बांधणे या कामाचा समावेश आहे. तसेच, हुतात्मा चौक वाळवा ते अहिरवाडीकडे जाणारा रस्ता डांबरीकरणासाठी 20 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या कामाचाही शुभारंभ यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील व वैभव नायकवडी यांनी मनोगत व्यक्त करताना गेल्या साडेचार वर्षात केलेल्या विकासकामांबद्दल माहिती दिली. स्वागत व प्रास्ताविक गौरव नायकवडी यांनी केले. सूत्रसंचालन बजरंग गावडे व के.व्ही. पाटील यांनी केले. आभार सरपंच डॉ. शुभांगी माळी यांनी मानले. या कार्यक्रमास वाळवा ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.