फोटो ओळ - सागाव येथे शनिवारी सकाळी मुख्य चौकात असा शुकशुकाट होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत :
शिराळा तालुक्यातील सागाव येथे कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक मोठ्या संख्येने वाढत आहेत. दि. १७ एप्रिलअखेर गावात कोरोनाचे ७४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर एक रुग्ण दगावला आहे. यामुळे गावची हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. कोरोनाबाबत गावात नागरिक बेफिकीर आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी नियम पाळावेत, असे आवाहन ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने केले आहे.
सागाव येथून कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा रस्ता जातो. परिणामी गावात लोकांची नेहमीच वर्दळ असते. शिवाय शिक्षणाच्या निमित्ताने परिसरातील तसेच शाहूवाडी तालुक्यातूनही विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. अशा परिस्थितीत सागावमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आरोग्य विभाग व ग्रामपंचायत लोकांमध्ये सातत्याने जनजागृती करीत आहेत. लसीकरणही युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, ग्रामस्थांची बेफिकिरी दिसून येत आहे.
कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्यानेच रुग्णसंख्या वाढत आहे. ग्रामस्थांनी जर काळजी घेतली नाही तर सर्वांनाच कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे.
बाहेरगावच्या नागरिकांनीही विनाकारण गर्दी टाळण्याची आवश्यकता आहे. पोलीस यंत्रणेनेही याबाबत अजून कडक पावले उचलण्याची गरज आहे.
चौकट
कणदूर, पुनवतलाही धोका
परिसरातील कणदूर, पुनवत येथेही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. परिसरातील सर्वच गावांत असंख्य नागरिक विनामास्क फिरताना दिसत आहेत. संचारबंदी असतानाही विनाकारण काहीजण फिरत आहेत. नियम मोडणाऱ्यांच्यावर कडक कारवाईची गरज आहे.