अशोक पाटील -इस्लामपूर-लाडेगाव (ता. वाळवा) येथील वैदूचा उपचार चव्हाट्यावर आल्यानंतर इस्लामपूर पालिकेने सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना एकत्रित करून बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी बैठक बोलावली. पालिकेने असे प्रबोधन करण्यापेक्षा जेथे बोगसपणे वैद्यकीय उपचार केले जातात, त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. सांगली जिल्ह्यासह सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या वैदूंची आजही चलती आहे.‘दारू सोडवायची आहे? चला लाडेगावला’, ‘कुत्रे चावले? चला कऱ्हाड तालुक्यातील वाघेरीला’, ‘मूतखडा पाडायचाय? चला पन्हाळा तालुक्यातील कोतोलीला’, ‘कावीळ झाली आहे? चला इस्लामपूरला’, अशा मौखिक जाहिराती सध्या जोरात सुरू आहेत. आयुर्वेदिक व झाडपाल्याची औषधे देणाऱ्या स्वयंघोषित आयुर्वेदाचार्यांची यात चलती आहे. इस्लामपूर शहरातील गल्ली-बोळात रुग्णालये थाटून मूळव्याध, भगेंद्रावर उपाय करणाऱ्या बंगाली बाबूंचीही संख्या वाढू लागली आहे. अशा डॉक्टरांना बहुतांशी रुग्ण बळी पडत आहेत.ग्रामीण भागातून आजही अघोरी उपाय करणारे वैदू आहेत. साप, विंचू चावलेल्यांच्या कानात तंबाखूचे पाणी पिळले जाते. हे पाणी पिळल्यानंतर विषाचा उतारा होतो, असा गैरसमज आहे. विविध आजारांवर झाडपाल्याची औषधे देणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागात काहीजण नावापुढे एम. डी. पदवी लावून व्यवसाय करतानाही दिसत आहेत. अशा डॉक्टरांवरही कारवाई करणे गरजेचे आहे.इस्लामपूर शहर व ग्रामीण भागातील असे काही डॉक्टर आहेत, की त्यांना कायदेशीर व्यवसाय करता येत नाही. तेही आज महिलांची प्रसुती करणे, टाके घालणे आदी प्रकार करत आहेत. अशांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अघोरी उपचार पध्दती...मोठ्या शहरात मूळव्याध व भगेंद्र याची शस्त्रक्रिया करण्यासाठी २० ते २५ हजार रुपये आकारले जातात. परंतु गल्ली-बोळात दुकान थाटलेल्या बंगाली डॉक्टरांकडून मूळव्याधीची शस्त्रक्रिया अत्यल्प दरात, परंतु अघोरी पध्दतीने केली जाते. त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. या डॉक्टरांना मेडिकल असोसिएशनची मान्यता तरी आहे का, याची तपासणी होणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात अद्याप बोगस वैदूंची चलती
By admin | Updated: March 23, 2015 00:34 IST