मिरज : सुट्टीच्या हंगामात रेल्वे प्रवासाला मोठी गर्दी असल्याने अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी रेल्वेस्थानकाला गराडा घातला आहे. मिरजेपासून बेळगाव, कऱ्हाड, कोल्हापूरपर्यंत रेल्वेत विक्री करण्यात येणाऱ्या अयोग्य दर्जाच्या खाद्यपदार्थांकडे रेल्वे अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. धावत्या रेल्वेत खाद्यपदार्थ विक्रीस बंदी असतानाही शेकडो अवैध विक्रेते रेल्वेगाड्यांतून सुमार दर्जाच्या खाद्यपदार्थांची विक्री करीत आहेत. रेल्वे कायद्यानुसार विक्रेत्याच्या वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय व विनापरवाना खाद्यपदार्थ विक्री गुन्हा असून, त्यासाठी दंड व तुरुंगवासाची तरतूद आहे. अनधिकृत विक्रेत्यांना प्रतिबंधाची जबाबदारी रेल्वेच्या वाणिज्य विभाग व रेल्वे सुरक्षा दलावर आहे. मात्र या दोन्ही यंत्रणांकडे असलेली अवैध विक्रेत्यांच्या यादीचा वापर निर्बंधाऐवजी वसुलीसाठी होत आहे. मिरज स्थानकात व रेल्वेगाड्यांत विक्री करणारे सुमारे शंभरावर विक्रेते असून, दरमहा मानधनाच्या बदल्यात अवैध विक्रेत्यांना सवलत देण्यात आला आहे. सुट्टीच्या हंगामात प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने एप्रिल व मे महिन्यात अवैध विक्रेत्यांच्या संख्येत दीडपट वाढ झाली आहे. धावत्या रेल्वेत अयोग्य दर्जाच्या खाद्यपदार्थांसह गुटखा विक्रीही जोमात आहे. मिरज स्थानकात प्रवाशांना दारू विक्री करणारेही कार्यरत आहेत. धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात काही विक्रेते रेल्वेतून पडून जायबंदी झाले आहेत. मिरज स्थानकात अवैध खाद्यपदार्थ, थंडपेय, फळे, गुटखा, सिगारेट, दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट आहे. रेल्वेच्या फिरत्या न्यायालयात प्रत्येक महिन्यात पाच विक्रेत्यांना पकडून हजर करण्यात येते. त्यासाठी प्रत्येकाला महिना ठरवून देण्यात आलेला आहे. मे महिन्यात रेल्वेच्या फिरत्या न्यायालयालाही सुट्टी असल्याने अवैध विक्रेत्यांना कोणाचाच निर्बंध राहिलेला नाही. हमाल नसल्याने प्रवाशांवर भारमिरजेपासून बेळगाव, कोल्हापूर व कऱ्हाडपर्यंत रेल्वेतून ये-जा करणाऱ्या विक्रेत्यांच्या टोळ्यात वारंवार हाणामाऱ्यांचे प्रकार सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी अनधिकृत विक्रेते व रेल्वेतील पॅँट्रीकारमधील विक्रेत्यांत मिरज स्थानकावर मारामारी होऊन निजामुद्दीन एक्स्प्रेसवर दगडफेक झाली होती. विक्रेत्यांत मारामारीची प्रकरणे मिटवून त्यांना आपापल्या हद्दीत व्यवसाय करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
अनधिकृत विक्रेत्यांचा रेल्वेला विळखा
By admin | Updated: June 3, 2015 01:06 IST