सांगली : शिवजयंती साजरी करताना कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे. प्रशासनाच्या वतीने याबाबत केलेल्या नियोजनास ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी केले.
ग्रामीण पोलीस ठाणे येथे हद्दीतील १४ गावचे पोलीसपाटील आणि शिवजयंती मंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांची गुरुवारी बैठक घेण्यात आली. यावेळी निरीक्षक बेदरे बोलत होते.
निरीक्षक बेदरे म्हणाले, शासनाने सार्वजनिक सण, उत्सव, यात्रा, जत्रा, मिरवणुका यांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. पुढील आठवड्यात साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सव साजरा करताना नियमांचे पालन करावे. मिरवणुकीला बंदी असल्याने त्यासाठीही प्रशासनास सहकार्य करावे. बैठकीस उपस्थित पोलीसपाटील, मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही आपल्या सूचना मांडल्या. या बैठकीस पोलीसपाटील, शिवजयंती मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.