लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या ऊसतोडणी यंत्रणेकडून एकरी १० हजार रुपये अतिरिक्त खंडणी घेत असल्याचा आरोप रयत पॅनेलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांनी आजी-माजी अध्यक्षांवर नाव न सोशल मीडियावरून केला आहे.
कृष्णा कारखाना समाधानकारक सुरू असल्याचा सत्ताधारी सहकार पॅनेलचा मुद्दा डॉ. मोहिते यांनी खोडून काढला आहे. तोडणी यंत्रणा एकरी दहा हजार रुपये खंडणी घेऊनच ऊसतोड घेतात, यावर आजी-माजी अध्यक्ष काहीच बोलत नाहीत. मग ऊस उत्पादकांनी कोणाकडे न्याय मागायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
ते म्हणतात की, वारणा-कृष्णा खोऱ्यातील ऊस उत्पादक तोडणीसाठी सैरभैर झाला आहे. शेती अधिकारी शोधून सापडत नाही. कारखाना ऊस गाळतोय, पण कोणाचा गाळतोय याचा थांगपत्ता कोणालाच नाही. गट कार्यालये निकामी झाली आहेत. गटअधिकारी, चिटबॉय उद्धट भाषेत बोलत आहेत. यांच्यावर अध्यक्षांसह संचालकांचे नियंत्रण नाही. तोडणी यंत्रणेच्या माध्यमातून ऊसतोडणी केली जात आहे. तोडणीसाठी अतिरिक्त खंडणी घेतली जाते. तोडणीच्या माध्यमातून एकरी दोन टन उसाचे नुकसान होत आहे. जे कारखाने बंद होते, परंतु खासगी कंपन्यांना चालविण्यास दिले आहेत, तेसुद्धा चांगला दर देत आहेत.
अक्रियाशील सभासद ठरवून त्याचे सभासदत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कारखान्याचे कार्यक्षेत्र मोठे आहे. तोडणीसाठी कारखाना पैसे भरतो; परंतु एन्ट्री फी, वाहनचालक शुल्क, चिटबॉय फंड, अतिरिक्त मजूर लावून होणारा खर्च सभासदांच्या माथी मारला जात आहे, यावर कोण निर्बंध घालणार, असा मुद्दा डॉ. मोहिते यांनी उपस्थित केला आहे.
फोटो - ०४०२२०२१-इंद्रजित मोहिते (सिंगल)