सांगली : सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करण्यात सरपंचांची भूमिका महत्त्वाची असून, सरपंचांनी या कामी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ‘सरपंच स्वच्छता संवाद’ या ऑनलाइन संवाद उपक्रमात पालकमंत्री पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात दि. २५ ऑगस्टपासून १०० दिवसांचे “स्थायित्व व सुजलाम अभियान” राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत स्थानिक पातळीवर लोकसहभागाच्या माध्यमातून सांडपाणी व्यवस्थापन करण्याकरिता शोषखड्ड्यांची निर्मिती केली जात आहे. जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी यात सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे म्हणाल्या, जिल्ह्यात शोष खड्डे करून सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक व अधिकारी यांचे सहकार्य आवश्यक आहे. या यंत्रणेला जिल्हा परिषद सर्व मदत करण्यास तयार आहे.
यावेळी सावळवाडी, ता. मिरजचे सरपंच राजकुमार उपाध्ये व भटवाडी, ता. शिराळाचे सरपंच विजय महाडिक यांनी आपला स्वच्छतेतील अनुभव सहभागी सरपंचासमोर व्यक्त केला. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव यांनी आभार मानले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक दिलीप मस्के यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
घर तिथे नळ जोडणी देणार : जितेंद्र डुडी
मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, जिल्ह्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठाबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. यात सरपंचांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटर पाणी व प्रत्येक घरी नळजोडणी देणे हा जिल्हा परिषदेचा उद्देश आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता यासोबत होणाऱ्या बाबी असून, सरपंचांच्या सकरात्मक सहभागाशिवाय शक्य नाही.