विटा : रोटरी क्लब ॲाफ विटा सिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी उत्साहात पार पडला. अध्यक्षपदी येथील औषध व्यावसायिक रोहित दिवटे, सचिवपदी कुक्कुटपालन व्यावसायिक सागर म्हेत्रे व खजिनदारपदी अमृतराव निंबाळकर यांची निवड करण्यात आली. या शपथग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षपदी कोल्हापूर येथील पूर्वाश्रमीचे बॅंकर, संगणक व्यावसायिक नासिर बोरसदवाला व नूतन सहायक प्रांतपाल सांगलीचे बांधकाम व्यावसायिक किशोर शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मावळते अध्यक्ष सुधीर बाबर यांनी गेल्या वर्षभरामध्ये राबविलेल्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देऊन नूतन पदाधिकाऱ्यांकडे पदभार साेपविला, तर नासिर बोरसदवाला यांनी विटा रोटरी परिवाराच्या वतीने गेल्या १७ वर्षांपासून राबविलेल्या समाजकार्यातील सातत्त्याबद्दल कौतुक केले. जागतिक रोटरीच्यावतीने जगातून पोलिओ हटविण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला जात आहे. यासाठी रोटरीने आजपर्यंत काेट्यवधी रुपयांचे योगदान दिले आहे. सद्यस्थितीमध्ये जगभरात केवळ दोन देशांत दोनच पोलिओचे रुग्ण आढळले आहेत. नजीकच्या काळात रोटरीने पाहिलेले पोलिओमुक्त जगाचे स्वप्न साकार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी नूतन अध्यक्ष रोहित दिवटे यांनी निवडीबद्दल आभार मानून येणाऱ्या वर्षात रोटरीच्या परंपरेस साजेसे काम करू, अशी ग्वाही दिली. किशोर शहा व प्रवीण दाते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रोटरी सदस्यांच्या परिवारातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विटा रोटरीचे संस्थापक किरण तारळेकर, डॉ. राम नलवडे, सुरेश म्हेत्रे, संजय भस्मे, दिलीप चव्हाण, बालाजी बाबर, कुमार चोथे, लक्ष्मणराव जाधव, नितीन पुणेकर, निळकंठ भस्मे, प्रफुल्ल निवळे, डॉ. गौरव पावले, डॉ. अविनाश लोखंडे, रमेश लोटके, मिलिंद चोथे, सुशांत भागवत, सागर लकडे, अमित आहुजा, ॲड. सचिन जाधव, अनुप पवार, सचिन भंडारे आदींसह सदस्य उपस्थित होते. रमेश लोटके व सुशांत भागवत यांनी सूत्रसंचालन केले. कोविडच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून हा कार्यक्रम झाला.
फोटो : १४ विटा १
विटा येथे रोटरी क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथग्रहण समारंभ झाला. यावेळी नासिर बोरसदवाला, नूतन सहायक प्रांतपाल किशोर शहा, किरण तारळेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.