सांगली : तानंग फाटा ते सुभाषनगर रोडवरील शेतातील घरावर दरोडा टाकून किमती ऐवज लंपास करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. या दरोड्यातील एका संशयिताला टाकळी फाटा येथे पाठलाग करून पकडण्यात आले, तर त्याचा साथीदार मात्र पसार झाला. या संशयितांकडून २४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
बादल कनक्या भोसले (वय २९, रा. एरंडोली, ता. मिरज) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे, तर त्याचा साथीदार कुश आनंदराव काळे हा फरारी झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तानंग फाटा ते सुभाषनगर रोडवरील अविनाश पाटील यांच्या शेतातील घरामध्ये बादल भोसलेसह त्याच्या सहा साथीदारांनी १७ डिसेंबर रोजी दरोडा टाकला. घरातील लोकांना चाकूचा धाक दाखवून सोने-चांदीचे दागिने लंपास केले होते. या दरोड्याचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी एलसीबीला दिले. पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत यांच्या पथकाला टाकळी फाटा येथे दोघेजण कमी दराने सोन्याचा ऐवज विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. दोघांना ताब्यात घेण्यासाठी पथकाने सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच बादल भोसले व कुशल काळे या दोघांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून बादल भोसले याला पकडले. त्याची कसून चौकशी केली असता, सुभाषनगर रस्त्यावरील दरोड्याचा उलगडा झाला. त्याच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र, कानातील फुले व एक चाकू असा २४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासासाठी त्याला मिरज ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
या कारवाईत उपनिरीक्षक दिलीप ढेरे, संजय कांबळे, सुधीर गोरे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, जितेंद्र जाधव, मुदस्सर पाथरवट, हेमंतकुमार ओमासे, विकास भोसले यांनी भाग घेतला.
चौकट
चार साथीदारांची नावे निष्पन्न
सुभाषनगर रोडवरील दरोड्यातील बादल भोसलेच्या चार साथीदाराची नावेही चौकशीत निष्पन्न झाली आहेत. सुहाग काळे, सिडलेस काळे, संतोष काळे, भारत भोसले अशी संशयितांची नावे आहेत. फरारी कुशलसह या चार साथीदारांचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.