लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेतील मिरज-पंढरपूर रस्त्यावर तानंग फाट्याजवळ पेट्रोल पंपाजवळ अजंठा कारखान्याच्या आवारात मजुराच्या घरावर पाच जणांनी दरोडा टाकला. चोरट्यांनी मजुराच्या लहान मुलाच्या गळ्यास चाकू लावून ठार मारण्याची धमकी देत सहा हजार रूपये आणि १८ ग्रॅम चांदी, एक मोबाईल असा ५० हजाराचा ऐवज लुटला नेला. चोरट्यांनी घरातील धान्य, कपडेही लंपास केले.
दरोड्याचा घटनेचे कारखान्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रण झाले आहे. शनिवारी रात्रीच्या या घटनेमुळे या परिसरातील नागरिकांत घबराट होती. मिरज-पंढरपूर रस्त्यावर तानंग फाट्याजवळ अजंठा प्रिकास्ट या कारखान्यात कुंपणासाठी सिमेंट खांब तयार करण्यात येतात. यासाठी राजस्थानातील ३० ते ४० स्त्री-पुरुष मजूर काम करत असून ते कारखान्याच्या बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री सर्व मजूर झोपी गेले असताना चोरटे तेथे आले. एका मजुराच्या खोलीचा दरवाजा उघडून चोरट्यांनी मजुराच्या लहान मुलाच्या गळ्यावर चाकू लावत त्याला ठार मारण्याची धमकी देत मुलाचे चांदीचे दागिने व घरातील सर्व धान्य, रोख रक्कम लंपास केली. यावेळी शेजारच्या खोल्यांच्या दरवाजाला कडी घातली होती. अन्य चार खोल्यांतील मजुरांचेही धान्य, कपडे चोरुन नेण्यात आले. या घटनेचे कारखान्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रण झाले आहे. रविवारी पहाटे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोड्याबाबत फिर्याद देण्यात आली.
पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी पाहणी केली. चोरट्यांनी दागिन्यांसोबत धान्य साहित्य, कपडे चोरून नेल्याच्या घटनेमुळे पोलीस चक्रावून गेले होते.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले. मात्र श्वान रस्त्यापर्यंत जाऊन घुटमळले. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट
मोटार चालक थोडक्यात बचावला
दरोडेखोरांनी येथून पुढे काही अंतरावर पंढरपूर रस्त्यावर लघुशंकेसाठी थांबलेल्या मोटारचालकाला लक्ष्य केले. चालकाने गाडी चालू करून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने चोरट्यांनी लोखंडी गजाने मोटारीची काच फोडून रोखण्याचा प्रयत्न करीत चाळीस हजारांचा मोबाईल हिसकावला. चोरट्यांकडे लाठी, चाकू, लोखंडी गज ही हत्यारे होती. यावेळी मोटार चालकाने पलायन केल्याने अनर्थ टळला.