सांगली/कसबे डिग्रज : कृष्णाकाठी मगरींचा वावर वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे त्यांनी मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच वन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजना करण्याची मागणी केली. मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेले उमराव घाडगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते सोमवारी कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे आले होते. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्याकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यानंतर लगेचच पाटील यांनी ग्रामस्थ, प्राणीमित्र व वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सांगलीतील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. पाटील म्हणाले, मगरींकडून हल्ले होण्याचे प्रकार गेल्या दोन-तीन महिन्यात वाढले आहेत. मगरीच्या भीतीमुळे दैनंदिन कामासाठी नदीवर, पाणवठ्यावर जाणे बंद करणे शक्य नाही, तरीही ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी. विभागीय वन अधिकारी समाधान चव्हाण, वनक्षेत्रपाल एस. एम. खोत यांनी मगरींपासून संरक्षणासाठी जाळी लावावी, प्रबोधन फलक लावावेत, असे उपाय सुचविले. मात्र ते फारसे उपयुक्त नसून, कृष्णाकाठ मगरींच्या दहशतीखाली असल्याचे सरपंच अजयसिंह चव्हाण यांनी सांगितले. यावेळी अजित ऊर्फ पापा पाटील, तबरेज खान, किरण नाईक, विशाल गायकवाड, आनंदराव नलवडे, मोहनराव देशमुख, कमलाकर पाटील, अण्णासाहेब सायमोते उपस्थित होते. (प्रतिनिधी/वार्ताहर)
नदीकाठच्या ग्रामस्थांनी मगरींपासून सावध रहावे
By admin | Updated: August 18, 2015 00:36 IST