सांगली : सांगली शहरात महापुराच्या काळातही दळणवळण सुरू राहण्यासाठी रिंगरोड व काही पूल उभे करावेत. पाणी निचऱ्यासाठीही उपाययोजना करावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडला.
सांगलीतील महापुराची पाहणी व आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सांगलीत आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. यावेळी सुरेश पाटील म्हणाले, महापुरात कोल्हापूर ते सांगली, पेठ ते सांगली हे दोन्ही महामार्ग बंद होतात. यामुळे मिरज व सांगली शहराचे दळणवळण बंद होते. त्यासाठी भविष्यात पुराच्या पाण्याची पातळी ६० फूट गृहित धरून त्याप्रमाणे संपूर्ण सांगली-मिरज-कुपवाड शहराभोवती रिंग रोड व पूल तयार केला पाहिजे. त्याचप्रमाणे सांगलवाडी टोल नाका ते बायपास रस्त्याची उंची वाढवणे आवश्यक आहे.
सांगली शहरांतील पावसाच्या पाणी निचऱ्यासाठी महापालिकेने जी योजना सादर केली आहे, त्याला मान्यता द्यावी. महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांचे सततच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा.
विष्णुअण्णा भवनात मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, सचिव प्रशांत पाटील, गोपाळ मर्दा व अण्णासाहेब चौधरी उपस्थित होते. सुरेश पाटील म्हणाले की, गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे व सध्या पुरामुळे व्यापारी अत्यंत नुकसानीत आहेत. तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच महापालिकेचे कर भरण्यासाठी व्यापाऱ्यांना मदत करावी.