सचिन लाड ल्ल सांगली चोवीस तास रस्त्यावर असणारा आणि गल्लीबोळात कुठेही प्रवासी घेऊन जाणारा रिक्षाचालक आता पोलिसांचा खबरी होणार आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी गुन्हे रोखण्यासाठी ‘खबरी रिक्षाचालक’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी त्यांनी सांगली, मिरजेतील रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून या उपक्रमात सहभागी होण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात अंतिम चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी पोलीस मुख्यालयात बैठकही आयोजित केली आहे. पोलीस आणि रिक्षाचालक यांच्यात वाहतूक नियमांच्या उल्लंघनावरून नेहमी खटके उडतात. यामुळे पोलीस म्हटले की रिक्षाचालक जरा लांबच राहतात. समाजातील दुर्लक्ष घटक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असले तरी, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. २४ तास ते रस्त्यावर व्यवसायानिमित्ताने असतात. थंडी, ऊन किंवा पाऊस कोणताही हंगाम असो, रिक्षा फिरविल्याशिवाय त्यांच्या संसाराचा गाडा चालत नाही. मुख्य बसस्थानकासह शहरातील सर्व बस थांब्यांवर, रेल्वे स्थानके, चित्रपटगृह, मॉल, मल्टिप्लेक्स, शासकीय व खासगी रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, मंदिर, मोठ्या अपार्टमेंट परिसर अशा महत्त्वाच्या ठिकाणी खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, घरफोडी, साखळीचोरी, अपघात असे महत्त्वाचे गुन्हे भरदिवसा घडतात. अनेकदा तेथेच रिक्षाचालकही प्रवाशांची प्रतीक्षा करीत थांबून असतात.अनेक गुन्हे रिक्षाचालकांसमोर यापूर्वी घडले आणि आजही घडत आहेत. मात्र पोलिसांच्या चौकशीची कटकट नको म्हणून त्यांनी माहिती देण्याचे टाळले. पोलिसांची कामाची पद्धत पाहून रस्त्यावर एखादा अपघात झाला, तरी त्याची माहिती देण्यास लोक टाळतात. मात्र आता तसे काही होणार नाही, याचे नियोजन पोलीसप्रमुख सावंत यांनी केले आहे. रिक्षाचालक हा समाजात वावरणारा महत्त्वाचा घटक आहे. कधी, कुठे, काय घडले आहे, याची सर्व माहिती त्यांच्याकडे असते. त्यांच्याकडील माहिती मिळाली, तर गुन्हे रोखण्यासाठी व गुन्हेगारांना पकडण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो.
रिक्षावाला होणार पोलिसांचा खबरी!
By admin | Updated: July 7, 2014 00:41 IST