अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : सत्ताधारी विकास आघाडीसह नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना डावलून विरोधी राष्ट्रवादीने शहरातील पाच कोटींच्या विकासकामांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सुरुवात केली. दुसरीकडे विकास आघाडीने भुयारी गटारी योजनेला मंजुरी आणून त्यावर दहा कोटी रुपये खर्च केले आहेत. परंतु मल:निस्सारण केंद्रासाठी लागणाऱ्या जागेमध्ये न्यायालयीन अडचणी निर्माण झाल्याचे समजते. त्यामुळे भुयारी गटारी योजनेच्या कामाचा उलटा प्रवास सुरू झाला आहे.
शहरात भुयारी गटारींची कामे सध्या काम बंद आहेत. जेथे भुयारी गटारीची कामे पूर्ण झाली आहेत, तेथे रस्तेच झाले नाहीत. मुख्य रस्ते आणि उपनगरांतील भुयारी गटारीचे काम थांबल्याने नवीन रस्ते करण्यात अडचणी आहेत. त्यामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. याबाबत नागरिकांनी राष्ट्रवादीच्या बूथ कमिटीच्या बैठकीत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यामुळे पाटील यांनी तातडीने रस्ते आणि गटारीसाठी पाच कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. त्याची सुरुवातही करण्यात आली; परंतु सत्ताधारी विकास आघाडीने यावर आक्षेप घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यातच भुयारी गटारीसाठी लागणाऱ्या मल:निस्सारण केंद्राच्या जागा ताब्यात घेण्यासंदर्भात कायदेशीर अडचणी आल्याचे बोलले जात असून, या कामाचा आता उलटा प्रवास सुरू होणार आहे. जेथे भुयारी गटारीची कामे झाली नाहीत, तेथील रस्ते करता येणार नाहीत, हे स्पष्ट आहे.
कोट
भुयारी गटारीच्या कामांमध्ये राष्ट्रवादी जाणीवपूर्वक अडथळा आणत आहे. जेथे भुयारी गटारी झाल्या नाहीत, तेथील रस्त्यांचे उद्घाटन केले जात आहे. राष्ट्रवादीकडे ‘व्हीजन’ नाही. पाच कोटीचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मिळाला आहे. जयंत पाटील यांनी एकही रुपयाचा निधी दिलेला नाही. रस्त्यांची उद्घाटने मात्र सर्वांना अंधारात ठेवून रात्रीच्या वेळी करीत आहेत.
- वैभव पवार, नगरसेवक, उपाध्यक्ष, विकास आघाडी