सांगली : तेरा वर्षाच्या बालिकेचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथील जयपाल अण्णा कर्नाळे (वय ६३) या सेवानिवृत्त शिक्षकास दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्रन्यायाधीश पी. वाय. काळे यांनी गुरुवारी हा निकाल दिला. खटल्याची पार्श्वभूमी अशी, सेवानिवृत्त शिक्षक जयपाल कर्नाळे याचा बायपास रस्त्यावरील घाटगे हॉस्पिटलच्या पिछाडीस बंगला आहे. कुटुंबासह तो तेथेच राहायचा. पहिल्या मजल्यावर त्याने एक भाडेकरू कुटुंब ठेवले होते. एक महिला व तिची दोन लहान मुले असे हे कुटुंब होते. महिला धुणी-भांडी करत होती. १४ फेब्रुवारी २०१४ रोजी ती विश्रामबाग येथे धुणी-भांडी करण्यासाठी गेली होती. तिची मुलगी शाळेतून घरी आली होती. ती त्यांच्या खोलीत बसली होती. त्यावेळी कर्नाळे याने तिला स्वत:च्या खोलीत जबरदस्तीने ओढत नेले. त्यानंतर त्याने तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला होता. ही घटना कोणाला सांगितलीस तर तिघांनाही ठार मारीन, अशी धमकी दिली होती. सरकारतर्फे या खटल्यात दहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी, तिची आई, पंच कमल शिर्के, अजित पवार, सुनील सावंत, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली वेटम, डॉ. संतोष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अब्दुलहमीद ढाले यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सुरेश भोसले यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)धमकीला घाबरून १२ दिवस शांतकर्नाळे याने पीडित मुलीसह तिच्या आई व भावास ठार मारण्याची धमकी दिल्याने तिने घाबरून घडलेला प्रकार आईला सांगितला नाही. ती शाळेतून घरी आली की, शेजारी राहणारी तिची मैत्रीण ऐश्वर्या हिच्या घरी आई कामावरून येईपर्यंत बसत असे. ती दररोज तिच्या घरी जाऊन बसू लागल्याने आईने तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. तब्बल १२ दिवसानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. त्यानंतर आईने २५ फेब्रुवारीला फिर्याद दिली होती.
सेवानिवृत्त शिक्षकाला १० वर्षे सक्तमजुरी
By admin | Updated: August 14, 2015 00:04 IST