लोकमत न्यूज नेटवर्क
टाकळी : बेडग (ता. मिरज) येथील बिरोबा मंदिरातून चोरुन नेलेल्या मूर्ती चोरट्याने परत आणून ठेवल्या. ग्रामस्थांमध्ये हा विषय चर्चेचा बनला आहे.
गावाच्या उत्तरेला जुन्या रेल्वे बसस्थानकानजिक बिरोबा मंदिर आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी चोरट्यांनी मंदिरातील पितळी घोडे, बकऱ्यांच्या मूर्ती लंपास केल्या होत्या. गाभाऱ्याबाहेरील नऊ किलो वजनाचा पितळी नंदीही उचलून नेला होता. त्यांची किंमत अंदाजे दहा हजार रुपयांहून अधिक होती. मंदिरातच चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पुजाऱ्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार तपासही सुरु होता.
यादरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुजारी मंदिरात पूजेसाठी गेले असता, सर्व मूर्ती कोणीतरी परत आणून ठेवल्याचे आढळले. त्या सर्व सुस्थितीत होत्या. पुजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करुन मूर्ती ताब्यात घेतल्या. न्यायालयाच्या परवानगीने त्या परत दिल्या जातील, असे पोलिसांनी सांगितले.