सांगली : जिल्ह्यात दररोज हजार ते बाराशे नवीन कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. दररोज वाढत चाललेली रुग्णसंख्या चिंतेचा विषय असून, यावर तातडीने नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता आणि अद्यापही जिल्ह्यात कायम असलेली वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सध्या लागू असलेले निर्बंध आणखी कडक करण्यात येतील, याबाबतचे स्वतंत्र आदेश जिल्हाधिकारी देणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोना उपाययोजनांविषयक आढावा बैठकीसाठी पालकमंत्री पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात नव्याने आढळणारी रुग्णसंख्या चिंता वाढवणारी ठरत आहे. रुग्णांची संख्या लक्षणीय असल्याने परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेच लागणार आहेत.
लॉकडाऊन वाढतच चालल्याने व्यापारी व इतर घटकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापाऱ्यांनीही सहकार्य करावे. पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांपेक्षा कमी आला की सर्व व्यवहार सुरळीत करण्यास अडचणी नाहीत. त्यामुळेच सध्या लागू असलेले निर्बंध आणखी कडक केल्याशिवाय रुग्णसंख्या कमी होणार नाही. याबाबतचे स्वतंत्र आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी मंगळवारी अथवा बुधवारी जाहीर करतील. भाजीपाला, किराणासह इतर अत्यावश्यक सेवा घरपोच देण्याची सोय करुन हे निर्बंध लागू करण्यात येतील, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
चौकट
गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवा
सध्या सुरु असलेल्या निर्बंधांमध्येही बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. विशेषत: विवाह कार्यक्रमात गर्दी वाढत आहे. ग्रामीण भागात लक्षणीय गर्दी वाढत असल्याने कोरोनाचा संसर्गही वाढत आहे. याशिवाय खाद्यपदार्थांचे हातगाडे आणि काही दुकानांमध्येही गर्दी वाढत असल्याने प्रशासनाने आता अशा गर्दीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष द्यावे, अशी सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी केली.