इस्लामपूर : शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या उपक्रमाला आज (शुक्रवारी) शहरातील शाळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मोदी गुरुजींच्या या शाळेचा लाभ शहरातील सुमारे सहा ते सात हजार विद्यार्थ्यांनी घेतला. बहुतेक शाळांमधून स्क्रिन प्रोजेक्टरद्वारे या उपक्रमाचे प्रक्षेपण केले गेले.शिक्षक दिनाचे औचित्य साधत पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील दूरदर्शनच्या वाहिन्यांवरून संवाद साधला. यावेळी स्थानिक विद्यार्थ्यांशी त्यांचा प्रश्नोत्तराचा कार्यक्रमही दाखवण्यात आला. देशात असा पहिलाच उपक्रम होत असल्याने त्याविषयी उत्सुकता होती. सर्वच शाळांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना हा उपक्रम पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिली.इस्लामपुरातील आदर्श बालक मंदिर, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती कविता शिंगटे म्हणाल्या की, शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा हा पहिलाच उपक्रम अत्यंत भावस्पर्शी वाटला. देशप्रेम, त्याग आणि सेवेचा संदेश देणारे त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना प्रगतीची प्रेरणा देणारे आहे.येथील आदर्श शिक्षण संकुलातील प्राथमिक व माध्यमिकच्या तीन हजार मुला-मुलींनी दोन स्क्रिनद्वारे मोदींचे भाषण ऐकले. मॉडर्न हायस्कूल साखराळे, यशवंत हायस्कूल इस्लामपूर, इस्लामपूर हायस्कूल, महात्मा फुले विद्यालय, सद्गुरु आश्रमशाळा अशा मोठ्या विद्यार्थीसंख्येच्या शाळांसह जि. प.च्या प्राथमिक शाळांमधूनही हा कार्यक्रम दाखविण्यात आला. (वार्ताहर)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा उपक्रम चांगला वाटला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना प्रश्न विचारण्याचीही संधी दिली गेली, हे महत्त्वाचे आहे. जगाच्या स्पर्धेत टिकणारी सक्षम पिढी उभी करण्याचा मनोदय त्यांच्या संवादातून व्यक्त झाला, तो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.- एस. एन. पाटील, मुख्याध्यापक, मॉडर्न हायस्कूल, साखराळे