ओळ : सांगलीत वफ्फ न्यास नाेंदणी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचे मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव सुफियान पठाण यांनी स्वागत केले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगलीतील मदनी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वफ्फ न्यास नाेंदणीबाबत कायदेशीर मार्गदर्शन व प्रस्ताव दाखल करण्यासाठी आयाेजित शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात १७९ संस्थांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील विविध संस्थांच्या अडचणी सुटणार असल्याची माहिती मदनी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सदाम सय्यद व महासचिव सुफियान पठाण यांनी दिली.
ते म्हणाले की, वक्फ न्यास नोंदणी व कागदपत्रांची पूर्तता व कायदेशीर प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वक्फ कार्यालयाच्या आधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा दौरा नियोजित केला आहे. सांगलीत मदनी ट्रस्टच्या माध्यमातून शिबिर घेण्यात आले. जिल्ह्यातील ज्या संस्थांनी वक्फ बोर्ड औरंगाबाद येथे नोंदणीसाठी दाखल केलेले प्रस्ताव मंजूर झालेले नाहीत किंवा ज्यांनी अजून नोंदणीच केलेली नाही, तसेच कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही, अशा सर्वच बाबतीत यावेळी मार्गदर्शन करून कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव दाखल करून घेण्यात आले. सांगली जिल्ह्यातील मशिदी, दर्गाह, कब्रस्तान, ईदगाह व मदरसे अशा तब्बल १७९ संस्थांनी या संधीचा लाभ घेतला.
शिबिरात वक्फचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारुख पठाण, विधी सल्लागार उबेद पटेल, प्रादेशिक वक्फ आधिकारी खुसरो खान तसेच आसिफ मुतवल्ली, काजी शारेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच ज्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत त्यांचे प्रस्ताव दाखल करून घेतले.
शिबिराचे नियोजन मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद व महासचिव सुफियान पठाण यांनी केले होते. यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे कायदेशीर सल्लागार ॲड. असिफ आत्तार, इम्रान बेग, मुफ्ती मुजम्मिल साहब, अझर सय्यद, हाफीज गौस तसेच नगरसेवक फिरोज पठाण, इस्लामपूरचे आबिद मोमीन उपस्थित होते.