येलूर येथील मुख्य चौक असलेल्या शिवाजीनगर परिसरातील सर्व दुकाने बंद होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
येलूर : येलूर (ता. वाळवा) येथे रविवारपासून मंगळवारपर्यंत आपत्ती व्यवस्थापन समितीने संपूर्ण गावात पुकारलेल्या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या महामारीत येलूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढल्याने आपत्ती व्यवस्थापन समितीने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवारी संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय बैठकीत घेतला होता. यामध्ये मेडिकल्स, रुग्णालये, दूध संस्था वगळता, गावातील सर्व दुकाने, सहकारी संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गावातील व्यापाऱ्यांनी या बंदला चांगला प्रतिसाद दिला आहे. सर्व व्यवहार बंद आहेत. विनाकारण कोणीही बाहेर फिरत नाही. रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
गावातील लोकांचे, व्यापारी वर्गाचे अशाच पद्धतीचे सहकार्य मिळाले, तर आपण कोरोनाची साखळी तोडू शकू, असा विश्वास आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला.