सांगलीः शामरावनगरासह उपनगरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याच्या दृष्टीने धामणी रोडवरील लालबाग हॉटेल ते अंकली वीटभट्टीपर्यंतचा साडेतीन किलोमीटरचा नैसर्गिक नाला मोकळा करण्यास जिल्हा परिषद व महापालिकेने संमती दिली आहे. त्यामुळे शामरावनगरमधील पावसाळी पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न बऱ्याचअंशी मार्गी लागणार असल्याचे नगरसेवक अभिजित भोसले यांनी सांगितले.
शामरावनगरमध्ये वर्षानुवर्षे पावसाळ्यात पाण्याची तळी साचतात. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी नगरसेवक भोसले यांनी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
भोसले म्हणाले की, मुसळधार पावसाने कोल्हापूर रोड ते खरे हौसिंग क्लब, शामरावनगरातील अंतर्गत रस्ते, आप्पासाहेब पाटीलनगर, रामकृष्ण परमहंस सोसायटी, हनुमाननगर, भक्तीनगर, कुंठे मळा, नारायण कॉलनी, आदी भागातील २५ हजार लोकवस्तीला धोका निर्माण होतो. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, आयुक्त नितीन कापडणीस यांना बरोबर घेऊन १९४०-४५ मधील नालेदर्शक नकाशे घेऊन सर्व नाल्याची पहाणी केली. प्रत्यक्ष पत्रव्यवहारही झाला होता. दरम्यान कोरोनामुळे हा नाल्याचा प्रस्ताव थांबला होता.
जिल्हाधिकारी चौधरी यांची भेट घेऊन या नाल्याच्या कामाबाबत चर्चा केली. नाला खुला करण्यासाठी महापालिका हद्दीतील काम महापालिकेने आणि जिल्हा परिषदेच्या हद्दीतील काम जिल्हा परिषदेने करण्याचे ठरले आहे. हा नाला साडेतीन किलोमीटरचा आहे. तो मोकळा झाल्यास ३५ वर्षापासूनचा सांगलीला भेडसावणारा प्रश्न सुटेल, असे सांगितले.
चौकट
निर्णय झाला आता कार्यवाहीची अपेक्षा
जिल्हा परिषद आणि महापालिका यांच्यात झालेल्या चर्चेनुसार तातडीने पावले उचलली गेली तर नाले खुले करण्याचा प्रश्न सुटेल. शहराच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अंकली नाला खुला केला तर पावसाच्या पाण्याचा निचरा तातडीने होईल. आता याबाबतचा निर्णय झाला असल्याने त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणीही भोसले यांनी केली.