लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : अनेक दिवसांपासून कोकरुड फाट्यावरील अतिक्रमणे रस्ता रुंदीकरणाच्या कामात निघाली. तसेच उर्वरित अतिक्रमणेही ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी काढल्याने कोकरुड फाट्याने अखेर मोकळा श्वास घेतला आहे.
पाचवड फाटा ते कोकरुड तसेच तासगाव ते कोकरुड हे दोन्ही राज्यमार्ग कोकरुड येथे एकत्रित आले आहेत. या मार्गावर ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाण्यादरम्यानच्या हमरस्त्यावर दुतर्फा असणाऱ्या रिकाम्या मोकळ्या जागेत अनेकांनी जनावरांच्या शेडसह इतर व्यवसाय थाटले होते.
कोकरुड ग्रामपंचायतीने शनिवारी आणि रविवारी दोन जे.सी.बी. मशीनच्या साहाय्याने अतिक्रमणे जमीनदोस्त केली. यापूर्वीही ग्रामपंचायतीमार्फत अशीच अतिक्रमणविरोधी मोहीम राबबविण्यात आली होती. अतिक्रमणे काढताना काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र कोकरुड पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तो निवळला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, माजी सरपंच श्रीरंग नांगरे, उपसरपंच पोपट पाटील, प्रा. ए. सी. पाटील, नंदकुमार पाटील, मोहन पाटील, अंकुश नांगरे, संजय घोडे, अनिल घोडे, लखन नांगरे, रोहित घोडे आदी उपस्थित होते.
कोट
अतिक्रमणे काढल्यानंतर या चौकात ग्रामपंचायतीच्यावतीने कोकरुड फाट्यासह अनेक ठिकाणी सुशोभिकरण करण्यात येणार आहे. कोणीही विनापरवाना अतिक्रमण करून उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
- पोपट पाटील, उपसरपंच