लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथील पीडित बौद्ध कुटुंबीयांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.
याप्रश्नी संघटनेने उपजिल्हाधिकारी माैसमी बर्डे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, संबंधित कुटुंबाचे राहते घर काही लोकांनी जेसीबीने पाडले, पीडित कुटुंबातील नामदेव कांबळे, वर्षा कांबळे, विठ्ठल कांबळे, मंगल कांबळे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत छावणी आंदोलनास बसले होते. संघटना प्रमुख अमोल वेटम, ऑल इंडिया पँथर सेनेचे स्वप्नील खांडेकर यांनी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांची भेट घेऊन लेखी निवेदनातून आरोपींवर गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाईची मागणी केली होती.
याची दखल घेत तत्काळ बर्डे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षितकुमार गेडाम यांना कारवाई करणेबाबत कळविले. जिल्हा पोलीस प्रमुखांनीही तातडीने यावर कारवाई करत कवठेमहांकाळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यास सांगितले. त्यानुसार संबंधितांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशासनाच्या धाडसी कारवाईचे स्वागत आम्ही करतो, असे निवेदनात म्हटले आहे.