सांगली : सात-बारा उताऱ्यावर पिकांची नोंदणी करण्यासाठी यापूर्वी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात जावे लागत होते. मात्र, आता शेतकरी स्वत: आपल्या सात-बारा उताऱ्यावर पिकाची नोंद करू शकणार आहेत. यामुळे पीक कर्ज, पीक विमासह शासनाकडून मिळणारा मोबदला मिळण्यास सोयीचे होणार आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ॲपद्वारे पिकांची नोंद करावी. ॲप सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील १० हजारावर शेतकऱ्यांनी ॲपद्वारे पिकांची नोंदणी केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.
ई-पीक पाहणी ॲपबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, ई-पीक पाहणी ॲपमुळे शेतकऱ्यांना स्वत:च्या बांधावर जाऊन पीक नोंदणी करता येणार आहे. एकाच सात-बारावर जेवढे खातेदार असतील, त्या सर्व खातेदारांना त्यांचे कोणते क्षेत्र आहे व किती क्षेत्र आहे, याचीही नोंद करता येणार आहे. त्यामुळे हे ॲप वापरण्यासाठी अत्यंत सुलभ आहे.
पिकांच्या नोंदीसाठी शेतकऱ्याचा थेट सहभाग असल्याने अचूक आकडेवारी मिळणार असून, शेतात पीक उभे असतानाच पीक पाहणीच्या नोंदी होणार आहेत. यानंतर त्याची सात-बारा उताऱ्यावर तात्काळ नोंदही होणार आहे. त्यामुळे १५ सप्टेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद ॲपद्वारे करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.