कोकरुड : मुंबई, ठाणे, पुणेसह परिसरात जाणाऱ्या खासगी आराम बस चालकांनी प्रवासी दरवाढ दोनशे रुपयांनी कमी केल्याने शिराळा -शाहूवाडी प्रवासी वाहतूक संघटनेने आंदोलन मागे घेतले आहे. रविवारपासून आणखी दर कमी होणार असल्याने प्रवासी वर्गातून ‘लोकमत’ व संघटनेचे आभार मानले जात आहे.
चांदोली ते मुंबई आणि मलकापूर ते मुंबई या मार्गावरून दररोज दहा ते पंधरा खासगी बसची ये-जा असते. गणपती उत्सव, दिवाळी सुट्टी, उन्हाळी सुट्टी, लग्न सराई या कालावधीत नियमित असणाऱ्या दराची आकारणी न करता तिप्पट पैसे घेत खासगी आराम बस चालकांकडून प्रवाशांची लूट होत असते. याबाबत संघटनेकडून पंधरा दिवसांपूर्वी लेखी निवेदन दिले होते. तरीही गणेश उत्सवात मुंबई, ठाणे, पुणेसह परिसरातून आलेल्या प्रवाशांकडून पुन्हा खासगी बस चालकांनी वाढीव दर घेतले. यामुळे शिराळा-शाहूवाडी प्रवासी संघटनेने करुंगली (ता. शिराळा) येथे खासगी बसची प्रवासी वाहतूक बंद पाडली होती. चालकांची मुजोरी कमी झाल्याशिवाय गाड्या सोडणार नसल्याची भूमिका संघटनेने घेतल्याने यात शिराळा तहसील कार्यालय, कोकरुड पोलीस यांनी बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते.
गुरुवारी कोकरूड पोलीस ठाण्यात आराम बसचालक आणि प्रवासी संघटनेसोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या उपस्थित बैठक झाली. यात रविवार दि. १९ पर्यंत ६५० प्रती शीट व ७५० स्लीपिंगला असा दर ठरवण्यात आला; तर रविवार दि. २० पासून नियमित प्रती प्रवासी ५०० रुपये दर आकारण्यात आला आहे.