सांगली : बक्षीसपत्राची नोंदणी करून सिटी सर्व्हे उतारा देण्याच्या मोबदल्यात ७५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या नगर भूमापन अधिकारी सुरेश शिवमूर्ती रेड्डी (वय ४८, रा. गव्हर्नमेंट कॉलनी, सांगली) यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रेड्डी याच्या घराची झडती घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराच्या वडिलांनी तक्रारदार व त्यांच्या भावाच्या नावाने बक्षीसपत्राने मालमत्ता लिहून दिली होती. या बक्षीसपत्राची सिटी सर्व्हे उताऱ्यावर नोंद घेऊन, त्याचा उत्तारा देण्यासाठी रेड्डी याने एक लाखाची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपतशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती.
विभागाने केलेल्या पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. सोमवारी मुख्य प्रशासकीय इमारतीत असलेल्या नगररचना कार्यालयात रेड्डी यास लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल केला होता. रेड्डी यास न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.