सांगली : रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ ते ५ मे या कालावधीत धान्य वितरण बंद ठेवण्याचा निर्णय रेशनिंग दुकादनदार फेडरेशनने घेतला आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी अधिकारी वसुंधरा बारवे यांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुबारक मौलवी यांनी दिले.मौलवी यांनी सांगितले की, सांगली शहर व ग्रामीण संघर्ष रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने हा संप जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग फैलावत असल्याच्या काळात राज्यातील अनेक दुकानदार त्याचे बळी ठरले आहेत. अनेक दुकानदार कोरोनाने बाधित झाले आहेत. त्यांचा कोणताही विचार शासनाने केलेला नाही. मृत रेशन दुकानदारांच्या कुटूंबांना वार्यावर सोडले आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रास्त भाव धान्य दुकानदारांना त्यांच्या बोटांच्या ठशांद्वारे धान्य वितरणास परवानगी देण्याची आमची प्रमुख मागणी आहे. पॉस यंत्रावर प्रत्येक ग्राहकाच्या बोटांचे ठसे उमटविण्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने ही मागणी केली आहे. संघटनेने सांगितले की, कोरोनामुळे निधन झालेल्या दुकानदारांना विमा भरपाई देण्याचीही मागणी आहे.
या मागण्यांवर निर्णय होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानदार १ ते ५ मे या कालावधीत धान्य वितरण बंद ठेवतील. ७ मेपासून वितरण पूर्ववत सुरु होईल. निवेदनावर सचिव जयसिंग देसाई यांच्यासह बिपीन कदम, संजय कत्तीरे, रमजान बागवान, मदन कांबळे यांच्याही सह्या आहेत.