लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली. त्याला येथील न्यायालयाने १ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पीडित मुलीने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अवघ्या तासाभरात संशयिताच्या मुसक्या आवळल्या.
कृष्णा वासुदेव पवार (मूळ रा.पेठ, सध्या रा. कोळे) असे अटकेत असणाऱ्या संशयिताचे नाव आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये कृष्णा याने पीडित मुलीस लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर २६ जून २०२१ पर्यंत त्याने मुलीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवले. यातून गरोदर राहिल्याची भीती मुलीच्या मनात निर्माण झाली. तिने कृष्णाला गोळी आणण्यास सांगितले. दोन दिवसांपूर्वी रात्री पीडित मुलगी घराबाहेर भांडी घासत होती. त्यावेळी तेथे येऊन कृष्णा याने तिला शिवीगाळ करत मारहाण करू लागला. तुला फिट येत असल्याने मी तुझ्याशी लग्न करणार नाही असे म्हणू लागला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर तो पळून गेला. सहायक पोलीस निरीक्षक अनिल जाधव अधिक तपास करत आहेत.