Ramchandra Bhosale | साहित्यामुळे निकोप समाजनिर्मितीस बळ: रामचंद्र भोसले
साहित्यामुळे निकोप समाजनिर्मितीस बळ: रामचंद्र भोसले

आळसंद : साहित्य हे समाजमनाचा आरसा आहे. साहित्यातील ज्वलंत व वास्तव लिखाणाने निकोप समाजाची निर्मिती होत असते. साहित्यातून रंजल्या-गांजलेल्या माणसाला न्याय व ऊर्जा देण्याचे काम करावे, असे आवाहन संमेलनाध्यक्ष लेखक रामचंद्र भोसले (सातारा) यांनी केले.
बलवडी भा. (ता. खानापूर) येथील ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळाच्यावतीने २७ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते. यावेळी माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पवार, सामाजिक कार्यकर्ते भाई संपतराव पवार, स्वागताध्यक्ष अ‍ॅड. सतीश लोखंडे, वासंती मेरू आदी उपस्थित होते.
रामचंद्र भोसले म्हणाले, आचार व विचार हा माणसाच्या आयुष्याला नवा अर्थ प्राप्त करून देण्याचे काम करतो. नव्या पिढीच्या हाती मोबाईलऐवजी पुस्तक दिले पाहिजे. पुस्तकातून वैज्ञानिक दृष्टिकोन मिळतो. साहित्यातून माणसाला शहाणपण व संयम मिळतो.
डॉ. बी. एन. पवार म्हणाले, देशात सध्या दोन प्रवाह प्रचलित आहेत. एक पुरोगामी व दुसरा प्रतिगामी प्रवाह आहे. पुरोगामी विचारांची कास धरण्यासाठी साहित्य हे प्रभावी व उत्तम माध्यम आहे. साहित्यातून पुरोगामी विचारांची निर्मिती होत असते.
स्वागताध्यक्ष सतीश लोखंडे यांनी, साहित्यात वेगवेगळे प्रवाह कार्यरत असून त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. दुभंगलेल्या माणसांची मने जोडणाऱ्या साहित्याची खºयाअर्थाने निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रारंभी माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पवार यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. ‘लोककला आणि मराठी साहित्य’ या विषयावर प्रा. राजेंद्र पोळ यांनी मनोगत व्यक्त केले. दुसºया सत्रात कवी रमजान मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले.
या कार्यक्रमास मारुती पवार, शिवाजी पवार, बी. डी. कुंभार, कुसुम सावंत, रामचंद्र कास्कर, सु. धों. मोहिते, महादेव दुपटे, बापूराव पवार, डी. एम. सरवदे, छबन तुपे, संजय निकम, दीपक कुलकर्णी, हरिभाऊ पुदाले, प्रा. संतोष जाधव, शहाजी जाधव यांच्यासह साहित्यरसिक उपस्थित होते. जे. डी. पवार यांनी प्रास्ताविक केले. ओंकार जाधव यांनी सूत्रसंचालन केले. जगदीश पवार यांनी आभार मानले.

मुल्ला, शिंदे यांचे अभिनंदन
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेले लेखक सलीम मुल्ला, सुशीलकुमार शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव संमेलनस्थळी करण्यात आला.


Web Title: Ramchandra Bhosale
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.