सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा प्रसंग टाळण्यासाठी पंचगंगा नदीचे पाणी बोगद्यातून राजापूर बंधाऱ्यापर्यंत सोडण्याचा विचार होता. राजू शेट्टींना हे सर्व नको असेल तर ते काम आपण रद्द करू, पण त्यांनी हवेतले आरोप करू नयेत, अशी टीका जलसंपदामंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी येथे पत्रकारांशी बाेलताना केली.
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्याकडून पंचगंगा परिक्रमा पदयात्रा व मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत जयंत पाटील म्हणाले की, पूरग्रस्त शेतकऱ्यांना चांगली मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही जलदगतीने होणार आहे. शासनाने योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे शेट्टींना मोर्चा, पदयात्रा काढण्याची गरज नाही.
ते म्हणाले की, महापुरावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी करण्यासाठी कोल्हापुरातून राजापूर बांधाऱ्यापर्यंत बोगद्याने पंचगंगा नदीचे पाणी सोडण्याच्या प्रकल्पाचा विचार सुरू असल्याबाबत आपण मत मांडले होते. यावर शेट्टी यांनी आक्षेप घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरप्रसंग टाळण्यासाठी जनहिताचा निर्णय आम्ही घेतला आहे. शेट्टींना जर अशाप्रकारचा प्रकल्प नको असेल, तर तो आपण रद्द करू.
महापुराचा नागरिकांना वारंवार होणारा त्रास थांबावा, त्यावर कायमस्वरूपी चांगला तोडगा काढावा म्हणून शासन सर्व बाजूंनी विचार करीत आहेत. अनेक प्रस्ताव यासाठी येत आहेत. बोगद्याद्वारे पाणी नेण्याचा विचारही पुढे आला होता. त्याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर लगेचच शेट्टी यांनी आरोप केले. अशाप्रकारचे आरोप त्यांनी बंद करावेत, असे ते म्हणाले.