इस्लामपूर : लोकनेते राजारामबापू पाटील यांचे कार्य व चरित्र अधिक जोमाने राज्याच्या कानाकोपऱ्यांत आणि नव्या पिढीसमोर न्यायला हवे, अशी भावना आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली. देशाच्या पंतप्रधानांनी स्व. बापूंचे चरित्र अभ्यासावे, त्यांना देशातील शेतकऱ्यांचे हित कसे जोपासावे? याचे ज्ञान मिळेल, असा टोलाही त्यांनी दिला.
राजारामबापू पाटील साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, युवा नेते प्रतीक पाटील, पी. आर. पाटील, प्रा. शामराव पाटील, विनायक पाटील, विजयराव पाटील, शरद लाड, मनोज शिंदे, अविनाश पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते प्रामुख्याने उपस्थित होते.
आ. मिटकरी म्हणाले, बापूंनी ज्ञानगंगा खेड्या-पाड्यात नेली. लोक संपर्काचे प्रभावी साधन म्हणून पदयात्रा काढल्या. त्यांनी मोठा विरोध असतानाही १४ महिन्यांत साखर कारखाना उभा करून तालुक्याचे नंदनवन बनविले आहे. त्यांनी बोलण्यापेक्षा कृतीवर भर दिला आहे. त्यांचे चरित्र व चारित्र्य स्वच्छ होते, विरोधकही त्यांचा आदर करीत होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या खाते पुस्तिकेचे प्रणेते बापू आहेत.
जयंत पाटील यांनी उत्स्फूर्तपणे आ. मिटकरी यांची ओळख करून दिली. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण निर्मिती करण्यात आ. अमोल मिटकरी, खा. डॉ. अमोल कोल्हे यांचे योगदान मोलाचे आहे. आम्ही एकत्रित संपूर्ण राज्यात फिरलो, त्यांचे प्रत्येक भाषण एकावेसे वाटायचे. आशय तोच, मात्र सांगण्याची ढब वेगवेगळी असायची. ते माझे जवळचे मित्र बनले आहेत.
पी. आर. पाटील, सभापती शुभांगी पाटील, बाळासाहेब पाटील, भरत देशमुख, छाया पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, बाळासाहेब होनमारे, दत्ताजी पाटील, नेताजीराव पाटील, संजय पाटील, संग्राम पाटील, सुस्मिता जाधव, रोझा किणीकर, शंकरराव भोसले उपस्थित होते. उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी आभार मानले. विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळी- १७०१२०२१-राजारामबापू व्याख्यान न्यूज १ व २
राजारामनगर येथे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आ. अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जयंत पाटील, प्रतीक पाटील, मनोज शिंदे, शरद लाड, विजयराव पाटील उपस्थित होते.