मिरज : मिरजेतील अपेक्स केअर कोविड हॉस्पिटलवर महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने छापा टाकून कागदपत्रे ताब्यात घेतली. महापालिकेच्या प्रतिबंधानंतरही या रुग्णालयात नवीन रुग्ण दाखल करून घेण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले.
मिरजेतील अपेक्स कोविड रुग्णालयात उपचाराबाबत तक्रारींमुळे महापालिका आयुक्तांनी नवीन रुग्ण दाखल करून घेण्यास प्रतिबंध करून रुग्णालय बंद करण्याचे आदेश पंधरा दिवसांपूर्वी दिले आहेत. मात्र, रुग्णालय सुरुच असल्याने व रुग्णालयातील वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात येत असल्याच्या तक्रारीमुळे महापालिका आरोग्य अधिकारी डाॅ. सुनील आंबोळे यांनी शुक्रवारी रात्री रुग्णालयावर छापा टाकून तपासणी केली. यावेळी रुग्णालयात पाच रुग्ण उपचार घेत असल्याचे व रुग्णालय बंद करण्याच्या आदेशानंतरही नवीन रुग्ण दाखल करून घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबत रुग्णालयातील कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून येथील रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवून ॲपेक्स केअर बंद करण्यात येणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.