शिरटे : आजच्या आधुनिक जीवनशैलीत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. मी पक्षाच्या माध्यमातून या विषयावर विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आ. जयंत पाटील यांनी केले. रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथील प्राचीन हनुमान-लक्ष्मी मंदिर कलशारोहण व विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते़ पं़ स़ सभापती रवींद्र बर्डे, प्रा़ शामराव पाटील, विनायक पाटील, जि़ प़ सदस्या सौ़ सुनीता वाकळे, पं़ स़ सदस्या सौ. जयश्री कदम, सरपंच जे़ डी़ मोरे उपस्थित होते. यावेळी कृष्णा बँकेचे नूतन उपाध्यक्ष दामाजी मोरे, उपअभियंता रामचंद्र चव्हाण, अविनाश मोरे, राजेंद्र आडके, ग्रामसेवक जयवंत थोरात यांचा सत्कार करण्यात आला़ सकाळी प़ पू़ केदारनाथ महाराज यांच्याहस्ते कलशारोहण सोहळा झाला. आमदार पाटील यांच्याहस्ते सभामंडप, बाजारकट्टे, मशिदीसमोरील सभामंडप, मुख्य चौक सुशोभिकरण कामाचे उद्घाटन आणि शामराव मोरे चौक नामकरण फलकाचे उद्घाटन करण्यात आले. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी विरंगुळा केंद्र उभे करावे, अशी मागणी केली़ यावर आ़ पाटील यांनी, गावात जागा द्या, तेथे काय-काय सुविधा द्यायच्या त्या ठरवा, मी निधी देतो, अशी ग्वाही दिली. सरपंच जे़ डी़ मोरे यांनी स्वागत केले़ (वार्ताहर)मुस्लिम समाजाची देणगी आ़ पाटील यांनी गावातील मंदिर जीर्णोध्दाराबरोबरच मशिदीसमोरील सभामंडपासही निधी दिला़ तसेच गावातील मुस्लिम समाजाने मंदिराच्या जीर्णोध्दारास ५0 हजाराची देणगी दिली. याचा आ़ पाटील यांनी खास उल्लेख करून, गावातील सुशोभित मुख्य चौक, बाजूला सुंदर मंदिर पाहून, एका वजनदार गावात मुलगी दिल्याचे समाधान मुलींच्या बापांना होईल, असे म्हणताच एकच हशा पिकला़
ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न विधानसभेत मांडणार
By admin | Updated: April 28, 2015 00:19 IST