गोटखिंडी : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वाळवा तालुक्यातील गोटखिंडी, बावची, पडवळवाडी, वाळवा, शिरगाव, अहिरवाडी, गाताडवाडी, लोणारवाडी गावातील गणेश मंडळ व ग्रामपंचायतींनी सार्वजनिक गणेशोत्सव न करता सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठीची तयारी दर्शविली आहे. या गावांचा अन्य गावांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन आष्टा पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक अजित सिद यांनी केले.
आष्टा पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील गोटखिंडी, बावची पडवळवाडी येथील गणेश मंडळाचे कार्यकर्ते , ग्रामपंचायत पदाधिकारी, आष्टा पोलीस ठाणेचे निरिक्षक अजित सिद, सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज सुतार बैठकीत बोलत होते. त्यांच्या व शासनाच्या आवाहनास कार्यकत्याकडून प्रतिसाद देत सार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा व मंडळाकडून गावातून सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्याची तयारी दर्शविली आहे. गोटखिंडी येथील मशिदीमधील गणपती बसविण्याचे यंदाचे ४१ वे वर्ष आहे. तरीही झुझांर चौकातील मंडळाचे अध्यक्ष राहुल कोकाटे यांनी यंदा सार्वजनिक गणेशोत्सव न करता सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असल्याचे व इतर सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. सरपंच विजय लोंढे, उपसरपंच विजय पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष लालासाहेब थोरात, सागर डवंग, धैर्यशिल थोरात, अविनाश डवंग, हवलदार अशोक जाधव, एस एस सनदी उपस्थितीत होते. इतर गावातून सरपंच, उपसरपंच,सदस्य पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, संस्थाचे पदाधिकारी, आष्टा पोलीस , गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आष्टा पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मनोज सुतार, सरपंच विजय लोंढे, सागर डवंग, उपसरपंच विजय पाटील आदी उपस्थित होते.