शेगाव : जत तालुक्यातील दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ४ मे पासून सलग अकरा दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय शहरातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी जत नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किरण बिज्जरगी, फळे-भाजी संघटनेचे तालुका अध्यक्ष तम्माना मिरजे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, सुजय ऊर्फ नाना शिंदे, परशुराम मोरे, नगरसेवक लक्ष्मण ऊर्फ टीमू एडके, नगरसेविका जयश्री मोटे, नगरसेवक उमेश सावंत, गौतम ऐवळे, विक्रम ढोणे, आण्णा भिसे, कुमार कोळी, महेश गुरव, तेजस वनकुंद्रे, संतोष मोटे, अरुण साळे, पांडुरंग मळगे, आप्पू माळी आदी उपस्थित होते.
जत शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जत शहरात मंगळवारपासून सलग ११ दिवस जनता कर्फ्यू लागू केला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे. शहरातील सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. इतर सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार आहेत. तसेच शहरातील भाजीमंडई पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून स्पीकरवरून नागरिकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. तरी नागरिकांनी जनता सहकार्य करण्याचे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केले आहे.