सांगली : महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी आता सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने व दूध संघांना पत्र पाठवून, साखर व दुग्धजन्य पदार्थांबाबत माहिती मागविली आहे. एलबीटी विभागाने आता साखर व दुग्धजन्य पदार्थांचा घाऊक व्यापार करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी कडक पावले उचलली आहेत. गेल्या दीड वर्षात एलबीटीचा गुंता वाढत गेल्याने प्रशासनानेही कारवाईबाबत नरमाईचे धोरण स्वीकारले होते. त्यात महापालिका व लोकसभेच्या निवडणुकांमुळे प्रशासनावर राजकीय दबावही होता. व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत एलबीटी न भरण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे महापालिकेकडे केवळ अडीच हजार व्यापाऱ्यांचीच नोंद होऊ शकली. या व्यापाऱ्यांकडून महिन्याकाठी चार ते पाच कोटींचा कर वसूल होत होता. जकातीपेक्षा कमी कर जमा झाल्याने महापालिकेची आर्थिक स्थितीही डबघाईस आली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार व दैनंदिन खर्च भागविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. अखेर आयुक्त अजिज कारचे यांनी एलबीटी वसुलीसाठी कठोर भूमिका घेत ३५ व्यापाऱ्यांची बँक खाती सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एलबीटी अधीक्षक एस. जी. मुजावर यांनी बँक खाती गोठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पहिल्या टप्प्यात नोंदणी व कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.महापालिका हद्दीत साखर व दुग्धजन्य पदार्थांचे मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात. अशा व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यासाठी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून या व्यापाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. साखर कारखान्यांकडून किती साखर पालिका हद्दीतील व्यापाऱ्यांनी खरेदी केली, याचा तपशील हाती आल्यानंतर त्यांना नोटिसा बजाविल्या जाणार आहेत. या तीन जिल्ह्यांतील दूध संघांनाही पत्र पाठवून प्रशासनाने माहिती देण्याचे आवाहन केले आहे. दूध वगळता अन्य दुग्धजन्य पदार्थांना एलबीटी लागू आहे. त्यादृष्टीने महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. (प्रतिनिधी)
साखर, दुधाची माहिती द्या
By admin | Updated: August 27, 2014 23:20 IST