लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महाविकास आघाडीचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारप्रकरणी तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी सांगलीत भाजप महिला मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
जिल्हाध्यक्षा ॲड. स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने अप्पर तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, रेणू शर्मा या महिलेवर सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांनी बलात्कार केल्याचे प्रकरण समोर येत असताना पोलीस ठाण्यात संबंधित महिलेची तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे त्या महिलेने पोलीस आयुक्तांनाही निवेदन दिले. तरीही, पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. कोणतीही महिला तक्रार दाखल करण्यास आल्यानंतर ती त्वरित दाखल करावी, असे केंद्र सरकारचे निर्देश असतानासुद्धा केवळ राजकीय दबावापोटी हे प्रकरण खोटे असल्याचे सांगत प्रकरण नोंदविण्यास टाळाटाळ केली जात आहे. या प्रकरणाची शहानिशा करण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे.
मुंडे यांनी सोशल मीडियावरून पीडित महिलेच्या बहिणीशी परस्पर सहमतीने विवाहबाह्य संबंध असल्याचे व त्यातून दोन अपत्ये असल्याचा उल्लेख मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांची एकूण पाच अपत्ये असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगापासून ही माहिती त्यांनी लपवून ठेवली आहे. त्यामुळे ती जनतेचीसुद्धा फसवणूक आहे. मुख्यमंत्र्यांनीही आजवर या घटनेत भाष्य केले नाही. मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे असे घडले तर पोलीस प्रशासनावरचा लोकांचा विश्वास उडेल. त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.
आंदोलनात वैशाली पाटील, जयश्री कुरणे, अप्सरा वायदंडे, नसिमा शेख, नसिमा नाईक, कल्पना कोळेकर, सुश्मिता कुलकर्णी, माधवी वसगडेकर, छाया हाक्के, स्मिता पवार आदी सहभागी झाल्या होत्या.