कामेरी : वाळवा तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र कामेरी तालुका करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन असताना आष्टा किंवा पेठ तालुका व्हावा, अशी मागणी करणे चुकीचे असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व कामेरी तालुक्याची मागणी करणारे मुख्य प्रवर्तक रघुनाथ हळदे-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.याबाबत बोलताना हळदे-पाटील म्हणाले, वाळवा तालुक्याचे विभाजन करून वेगळा तालुका निर्माण करण्याबाबत राज्य शासनाने ३१/५/२00९ पूर्वी प्रस्ताव सादर करावेत, असा जाहीरनामा काढला होता. शासनाने दिलेल्या मुदतीत फक्त कामेरी तालुका होण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला गेल्याने इतर गावांचा तालुका म्हणून विचार होणार नाही. त्यानुसार शासनाकडून कामेरी तालुका का व्हावा, याबाबत काही मुद्द्यांचा खुलासा १0/५/२0१२ रोजी मागण्यात आला होता. त्यामध्ये कामेरी तालुका करण्याचा हेतू, कामेरी तालुक्यात नेमक्या कोणत्या गावांचा समावेश असावा, त्याचा नकाशा, इस्लामपूर-कामेरी अंतर ३ ते ४ कि. मी. असताना नवीन तालुका होण्याकामी ग्रामसभेचा ठराव, समाविष्ठ गावांची संमत्ती आहे का? या बाबींचा खुलासा मंडल अधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. तसेच स्वतंत्र कामेरी तालुका होण्याकामी प्रयत्न करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांनाही निवेदने दिली आहेत. तर १५/८/२00९ रोजी कामेरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये गावातील व परिसरातील लोकांना प्रत्येक कामासाठी इस्लामपूरला जावे लागू नये म्हणून नवीन कामेरी तालुका करावा व तालुक्याचे ठिकाण कामेरी गावात व्हावे, याबाबतचा ठराव करण्यात आला आहे.कामेरी तालुका होण्यासाठी सर्वती कागदपत्रे योग्य नमुन्यामध्ये शासनाकडे पाठविली असल्याने लवकरच वाळवा तालुक्याचे विभाजन होऊन कामेरी तालुका अस्तित्वात येईल, असा विश्वास हळदे-पाटील यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)कामेरी तालुका कधी अस्तित्वात येईल?कामेरी तालुक्यात नेमक्या कोणत्या गावांचा समावेश असावा, त्याचा नकाशा, इस्लामपूर-कामेरी अंतर ४ कि. मी. असताना नवीन तालुका होण्याकामी ग्रामसभेचा ठराव, समाविष्ट गावांची संमती आहे का? याचा अहवाल मंडल अधिकारी, तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे.
कामेरी तालुक्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित
By admin | Updated: November 27, 2014 00:22 IST