फोटो ओळ : शिरगाव (ता. कडेगाव) येथील शेतशिवारात असलेल्या घरात प्रसूत झालेल्या महिलसह तिचे बाळ व आशा स्वयंसेविका सारिका तोडकर.
प्रताप महाडिक
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : आशा स्वयंसेविकेच्या मदतीने शेतातील घरातच रोपवाटिका मजूर महिलेची प्रसूती करण्यात आली. ही घटना शनिवारी पहाटे चार वाजता शिरगाव (ता. कडेगाव) येथे घडली.
शिरगाव येथील शिवारात रोपवाटिकेमध्ये काम करणाऱ्या कुटुंबातील २७ वर्षीय गरोदर महिलेस प्रसूती वेदना सुरू झाल्याने आशा स्वयंसेविका सारिका तोडकर यांना पहाटे चारच्या सुमारास फोन आला. सारिका तोडकर या रोपवाटिकेलगत राहणाऱ्या त्या महिलेच्या घराकडे गेल्या. यावेळी प्रसूतिवेदना
जास्त होत असल्याने रुग्णवाहिका बोलवून मोहित्यांचे वडगाव आरोग्य केंद्रात तत्काळ पोहोचणे शक्य नव्हते. यामुळे आशा स्वयंसेविका सारिका तोडकर यांनी गटप्रवर्तक शबाना आगा यांना फोन केला. यावर शबाना आगा यांनी फोनवरून मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे सारिका तोडकर यांनी या महिलेची प्रसूती केली.
त्या मजूर महिलेने बाळाला जन्म दिला, मुलगी झाली. काही वेळाने आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेविका नीलम माने यांनी तेथे जाऊन योग्य ते प्राथमिक उपचार केले. दरम्यान, मोहित्यांचे वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सागर जाधव यांनी रुग्णवाहिका पाठवली आणि या रुग्णवाहिकेतून प्रसूत महिला व बाळाला आरोग्य केंद्रात आणले. योग्य ते उपचार केले. प्रसूतीला एक महिना अवधी असताना अगोदरच प्रसूती झाल्याने व बाळाचे वजन कमी असल्याने तसेच प्रसूत महिलेचा एचबी कमी असल्याने त्यांना कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले आहे.
चौकट
स्वयंसेविकेचे कौतुक रुग्णालयात किंवा आरोग्य केंद्रात प्रसूती व्हावी असे आरोग्य विभागाचे नियोजन असते; परंतु खूप अपवादात्मक व अपरिहार्यपणे ही प्रसूती झाली आहे. यावेळी आशा स्वयंसेविका सारिका तोडकर यांनी समयसूचकतेने प्रसूतीसाठी मदत केली. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.