तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. शनिवार दि. ११ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. उद्या, सकाळी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना होणार आहेत. मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.गेल्या आठवडाभरापासून निवडणूक शांततेत असली तरी, प्रचारसभा, पदयात्रा, बैठकांनी मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण तयार झाले होते. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने त्यांची पत्नी सुमनताई पाटील रिंगणात आहेत. या निवडणुकीत अन्य राजकीय पक्षांनी उमेदवार देऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केल्यानंतर त्याला प्रतिसाद देत एकाही पक्षाने उमेदवार रिंगणात उतरवला नाही. त्यामुळे पक्षीय पातळीवरची चुरस या निवडणुकीत नसल्याचे स्पष्ट आहे. पण सुमनताई पाटील यांना आठ अपक्षांचे आव्हान आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, माजी खासदार निवेदिता माने, माजी मंत्री जयंत पाटील, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शशिकांत शिंदे, आ. विद्या चव्हाण, आ. दीपक साळुंखे, कॉँग्रेसकडून माजी मंत्री पतंगराव कदम, मदन पाटील, प्रतीक पाटील यांनी मतदारसंघात सभा घेतल्या. आठवडाभरापासून सुरू असणारा जाहीर प्रचार आज थांबला. दुसरीकडे दि. ११ रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारसंघातील २८५ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी १ हजार ५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या, शुक्रवारी मतदान केंद्रावर अधिकारी रवाना होणार आहेत. (वार्ताहर)
प्रचार तोफा थंडावल्या
By admin | Updated: April 10, 2015 00:32 IST