सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील १५७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी कलम ८३ चे चौकशी अधिकारी डॉ. एस. एन. जाधव, तत्कालीन लेखापरीक्षक एस. एस. चोथे यांची सरतपासणी आता लांबणीवर गेली आहे. मदन पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्याजागी त्यांच्या वारसांची नोंद घेण्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांनी दिले. वारस नोंदीनंतर आता सुनावणीची पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्हा बॅँकेतील १५७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी तत्कालीन लेखापरीक्षक व चौकशी अधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार एस. एन. जाधव यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. चोथे यांचे प्रतिज्ञापत्र सादर झाले नव्हते. याप्रकरणी चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांच्यासमोर शनिवारी सुनावणी पार पडली. यावेळी तत्कालीन चौकशी अधिकारी व लेखापरीक्षकांची सरतपासणी होणार होती. मात्र मदन पाटील यांच्या वारस नोंदीअभावी ही प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे. वारस नोंदी तातडीने करण्याचे आदेश गुंजाळ यांनी दिले असून, त्यानंतर प्रत्यक्ष आरोपपत्रावरील सुनावणीस सुरुवात होईल. जाधव यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांनी केलेली चौकशी, पडताळण्यात आलेली कागदपत्रे आणि नियमांचा दाखला दिला आहे. पुढील सुनावणीवेळी प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने जाधव व चोथे यांची सरतपासणी होणार आहे. जिल्हा बॅँकेतील १५७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी गुंजाळ यांनी ९६ पानी आरोपपत्र यापूर्वी दाखल केले आहे. माजी संचालक, तत्कालीन अधिकारी, मृत संचालकांचे वारसदार अशा शंभरजणांचा यात समावेश आहे. (प्रतिनिधी) लेखी म्हणणे सादर करा चौकशी अधिकाऱ्यांनी लेखी अथवा तोंडी म्हणणे पुराव्यासह सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पहिल्या सुनावणीवेळी तत्कालीन दोन संचालक, दोन वारसदार, एक कार्यकारी संचालक व दोन व्यवस्थापकांनी म्हणणे सादर केले.
वारस नोंदीअभावी सरतपासणी लांबणीवर
By admin | Updated: November 29, 2015 00:59 IST