लोकमत न्यूज नेटवर्क
उमदी : अवैध खासगी सावकारीचा कायमचा बिमोड करण्यासाठी राज्य शासनाने जुन्या सावकारी कायद्यात आमूलाग्र बदल करून २०१४मध्ये नवीन कायदा मंजूर केला. मात्र, जत पूर्व भागातील उमदी परिसरात कर्नाटक राज्यातील धनदांडगे लोक राजकीय वरदहस्त व गुंडगिरीच्या जोरावर व्याजाने पैसे देऊन नागरिकांना वेठीस धरत आहेत. या अवैध सावकारीतून लाखो रुपयांची माया गोळा करत आहेत. त्यामुळे खासगी सावकारी करणाऱ्यांंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
दोन दिवसांपूर्वी उमदी येथील रमेश शेवाळे या शेतकऱ्याने खासगी सावकारीच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच काही दिवसांपूर्वी उमदी येथील एका मागासवर्गीय शेतकऱ्यांची जमीन कर्नाटकातील सावकारांनी लिहून घेतली होती; मात्र अव्वाच्या सव्वा व्याज आकारत त्या शेतकऱ्याला गावगुंड व काही राजकीय नेतेमंडळी यांच्या पाठिंब्याने शेतीसह घरातून हाकलून लावले. याची तक्रारदेखील त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली होती. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. याबाबत नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहेे.
हे खासगी सावकार गरीब व गरजू नागरिकांच्या अडचणींचा गैरफायदा उठवत १० ते २० टक्के व्याजाने पैसे देतात. हे सावकार कर्ज देताना अगोदरच कोऱ्या धनादेशावर सह्या किंवा जमीन, घरे, वाहने लिहून घेतात. जर व्याजाची रक्कम थकली तर सावकाराकडून शिवीगाळ तर केली जातेच. शिवाय संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन धमक्या दिल्या जातात.
चाैकट
अनेकांचे संसार वाऱ्यावर
या कर्जावरील व्याजाचे आकडे दिवसेंदिवस फुगत जातात. मग हे पैसे सावकाराला परत करणे कठीण होते. उमदी परिसरातून अनेकजण खासगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजाने घेतलेले पैसे परत करू न शकल्याने कुटुंबासह फरार झाले, तर अनेकजण कुटुंबाला वाऱ्यावर सोडून परागंदा झाल्याच्या घटना ताज्या आहेत.