लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना लसीकरणाचे पोर्टल मंदावल्याने प्रशासन वैतागले आहे. मंगळवारी दिवसभरात ५० टक्के लसीकरणही होऊ शकले नाही. दरम्यान, शहरातील खासगी डॉक्टरांनी लस घेण्यास नकार दाखविला आहे.
मंगळवारी ४३२ डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. सांगली ‘सिव्हिल’मध्ये २८, मिरज ‘सिव्हिल’मध्ये ४०, भारती रुग्णालयामध्ये ७०, वॉन्लेसमध्ये ३१, हनुमाननगर आरोग्य केंद्रात ५३ जणांना लस टोचण्यात आली. इस्लामपुरात ४७, कवठेमहांकाळमध्ये ७५, पलूसमध्ये ३२, कवलापुरात ५६ जणांना लस दिली. दिवसभरात नऊशेजणांच्या लसीकरणाचे नियोजन होते, प्रत्यक्षात ४३२ जणांचेच झाले.
लसीकरणासाठी देशभरात एकच पोर्टल असल्याने प्रचंड ताण येत आहे. लाभार्थ्यांची नावे नोंदविणे व मोबाईलवर संदेश देणे ही कामे पोर्टलवरून केली जातात. मंगळवारच्या लसीकरणासाठी पोर्टलवर नावे नोंदविण्याचे काम सोमवारी रात्री दीडपर्यंत सुरू होते.
महापालिका क्षेत्रातील खासगी डॉक्टरांना लसीकरणासाठी मंगळवारचे कॉल पोर्टलवरून देण्यात आले होते, पण डॉक्टरांनी लसीकरणाला नकार दिला. मधुमेह, रक्तदाबाचा विकार आहे, वय जास्त आहे, यापूर्वी कोरोना झाल्याने उपचार घेतले आहेत, कोरोनाची साथ संपली आहे, अशी विविध कारणे त्यांनी सांगितली. लस पूर्ण सुरक्षित असल्याने सर्वांनी टोचून घेण्याचे आवाहन शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे, तरीही खासगी डॉक्टरांनी नन्नाचा पाढा वाचला. लस ऐच्छिक असल्याने सक्ती करू नका, असेही समर्थन केले. डॉ. पोरे यांनी सांगितले की, खासगी डॉक्टरांच्या लसीकरणासाठी पुन्हा वेळापत्रक तयार केले जाईल. दोनवेळा कॉल दिले जातील, तरीही लस घेतली नाही, तर त्यासंदर्भातील निर्णय शासकीय स्तरावर होईल.
चौकट
जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतली लस
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी मंगळवारी शासकीय रुग्णालयात लस टोचून घेतली. लसीच्या प्रतिक्रियेसाठी अर्धा तास रुग्णालयातच विश्रांतीही घेतली. कोणताही दुष्परिणाम किंवा ॲलर्जी जाणवली नसल्याचे ते म्हणाले. प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. पोरे बुधवारी लस टोचून घेणार आहेत.
----------