भिलवडी : राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी आज (शनिवारी) समर्थकांसमवेत शक्तिप्रदर्शन करत भिलवडी (ता. पलूस) येथे केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यामुळे कधी अपक्ष म्हणून, तर कधी राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेऊन पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात लढणारे पृथ्वीराज देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याचे सिद्ध झाले. निष्ठावानांना महत्त्व न देणाऱ्या राष्ट्रवादीला आपण गेल्या महिन्यापूर्वीच राजीनामा पाठवून सोडचिठ्ठी दिली असून, कोणत्याही परिस्थितीत विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. देशमुख म्हणाले की, ही सदिच्छा भेट आहे, गडकरी आणि मी युती शासनाच्या कार्यकाळात सहकारी होतो, आजही आहोत. ते माझ्या मतदारसंघामधून येत आहेत, म्हणून स्वागत करणे क्रमप्राप्त आहे. पलूस-कडेगावची उमेदवारी महायुतीतील भाजपला जाणार की शिवसेनेला मिळणार, हे अजून ठरायचे आहे. मात्र यंदा निवडणूक लढविणारच आहे. ती पक्षाचा झेंडा घेऊन लढवू किंवा अपक्ष म्हणून लढवू. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती आर. एम. पाटील, अमरसिंह इनामदार, रमेश पाटील, मोहन पाटील, महावीर चौगुले, तानाजी भोई, विजय चोपडे, दिगंबर पाटील, नितीन नवले, राजेंद्र पाटील, दिलीप धनवडे, व्यंकोजी जाधव, आनंदा माळी, सोन्याबापू जाधव, अजित जाधव, शरद साळुंखे, गजानन मोहिते, तात्या वडेर, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
पृथ्वीराज देशमुखांनी घेतली गडकरींची भेट
By admin | Updated: September 14, 2014 00:12 IST