लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनामुळे जी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे कामगार आणि कष्टकरी वर्गाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोनाचा वेग स्थिरावत असून, निर्बंधांचे कडक पालन केल्यास वेग कमी होण्यास मदत होणार आहे. तरीही कोरोना संकट निवारणासाठी प्राधान्य देऊन काम सुरू आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ते बोलत होते. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तिसऱ्या लाटेचीही शक्यता व्यक्त करत आहेत.
काही रुग्णांना पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन ते तीन दिवसांतच व्हेंटिलेटर लावण्याची गरज भासत आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर्सचा तुटवडा भासत आहे. आता अजून २५ व्हेंटिलेटर्स आले असून, ते कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. तसेच आणखी २० व्हेंटिलेटर्स आले असून, त्यातील १७ व्हेंटीलेटर्स खासगी रुग्णालयांना तर तीन व्हेंटिलेटर्स शासकीय रुग्णालयांना दिले आहेत. त्यामुळे रुग्णांवर उपचारासाठी मदत होणार असल्याचेही ते म्हणाले.
चौकट
ऑक्सिजन प्लांटची लवकरच उभारणी
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यातच ऑक्सिजननिर्मिती करण्यासाठी प्लांटची उभारणी करण्यात येणार असून, त्याची ऑर्डर देण्यात आली आहे. प्रशासनाकडून याचे काम सुरू असून, लसीकरणाचेही नियोजन करण्यात येत ्आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.